नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गालगत शिरवणे एमआयडीसी सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करताना रस्त्याच्या कामात अडथळा नसलेल्या अनेक झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा आरोप शहरातील पर्यावरणप्रेमींनी केला असून, याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई शहरातील प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना झाडांची कत्तल सुरूच आहे. सायन पनवेल महामार्गाशेजारील सर्व्हिस रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार असून, अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. रस्त्याचे रुंदीकरण करताना अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येणार आहेत. परंतु या झाडांचे पुनर्वसन केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. रस्त्याच्या कामाला अडथळा नसलेली अनेक झाडे का तोडली, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिनेश ठाकूर यांनी उपस्थित केला असून, या प्रश्नासंदर्भात शहरातील पर्यावरणप्रेमींसह महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.