चिरनेर : उरणच्या द्रोणगिरी नोडमध्ये असणारे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सेंट्रल वेअर हाउिसंग कॉर्पोरेशनचे (सीडब्लूसी) गोदाम सुरू होण्याची शक्यता आहे. उरणच्या शिष्टमंडळाने नुकतीच सोमवारी सीडब्लूसीचे व्यवस्थापकीय संचालक हरप्रीत सिंग यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी सिंग यांनी शिष्टमंडळाला दीड ते दोन महिन्यांत गोदाम सुरू करण्याचे आश्वासन दिले. हे गोदाम गेल्या ११ महिन्यांपासून बंद असून कामगारांना पगार मिळालेला नाही. कंपनीच्या ठेकेदारांनी कामगारांची सुमारे दीड कोटी रुपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे पीएफसुद्धा काढण्यात अडचणी येत आहेत. कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. तणावामुळे कंपनीतील कामगाराचे हृदय विकाराने निधन झाले. अनेक आंदोलने झाली, कामगार निम्म्या पगारावर काम करण्यास तयार झाले मात्र तरीही कंपनी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गोदाम सुरू झाले नाही. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनीदेखील हे गोदाम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीदेखील हे गोदाम सुरू झाले नव्हते. शेवटी कामगारांनी कंपनीच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरू केले. विभागीय व्यवस्थापक अशोक कुमार दुबे यांनी दिल्लीतील व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक बोलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्या अनुषंगानेच सिंग यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी येत्या दोन दिवसांत कंपनी चालविण्याचे टेंडर काढण्यात येईल, असे सांगून एक ते दीड महिन्याच्या आत कंपनी पुन्हा सुरू होईल असे शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात माजी आमदार विवेक पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सीडब्लूसी गोदाम सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2015 3:46 AM