नवी मुंबई : सायबर सुरक्षा जनजागृतीच्या अनुशंघाने सीबीडी पोलिसांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, नागरिकांना पोलिसांच्या वतीने सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली. तसेच सायबर गुन्ह्यांचे बळी होण्यापासून वाचण्यासाठी इतरांमध्येही जनजागृती करण्याचे आवाहन केले.
वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षा जनजागृती अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी दक्ष नागरिक, विद्यार्थी यांची सायबर वॉरियर म्हणून देखील नियुक्ती केली जाणार आहे. याच अभियानाच्या अनुशंघाने परिमंडळ उपायुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी पोलिसांनी शनिवारी सायकल रॅली काढली. त्यामध्ये वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे, निरीक्षक हनीफ मुलाणी यांच्यासह इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच डी. वाय पाटील व भरती विद्यापीठ यांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यानुसार सुमारे 180 सायकलस्वारांनी सुमारे १२ किमी अंतर सायकल चालवून सायबर सुरक्षा मोहिमत सहभाग दर्शवला. त्या सर्वांना सीबीडी पोलिसांच्या वतीने सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांची पद्धत व अशा गुन्ह्यात फसवणूक टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याची देखील माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येकाने स्वतःसह इतरांमध्ये देखील जनजागृती केल्यास निश्चितच सायबर गुन्ह्यांना आळा बसेल असेही आवाहन केले.