पनवेल : पनवेलमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली असून, यामध्ये एक हजारांपेक्षा जास्त सायकलपटू सहभाग घेणार आहेत.
आंतराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू राजेंद्र सोनी यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन ५ ते ८ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबईमध्ये १९९० पूर्वी अशा प्रकारची सायकलिंग स्पर्धा भरविण्यात आली होती. पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ३५० महिला व ६५० पुरुष स्पर्धक सहभागी होणार आहेत. सोनी स्पिन यांच्या पुढाकाराने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
कळंबोली जेएनपीटी या ठिकाणी महिला व पुरुष गटासाठी प्रत्येकी पाच अशा १० गटांत ही स्पर्धा भरविली जाणार असल्याची माहिती राजेंद्र सोनी यांनी दिली. सोनी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू आहेत. त्यांनी सुमारे २५० पेक्षा जास्त सायकलिंग स्पर्धांत विजेतेपद प्राप्त केले आहे. ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे नेतृत्व केले आहे. या स्पर्धेच्या प्रायोजकांमध्ये नवी मुंबई पोलीस, पनवेल पालिका, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, वातावरण फाउंडेशन, भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड, रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींचा समावेश आहे.