नवी मुंबई -महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तर काही भागांत वादळी पावसाचे धुमशान अशी विचित्र स्थिती असतानाच आता चक्रीवादळाचे संकट घोंगावू लागले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या 24 ते 48 तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. संभाव्य वादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील 24 ते 48 तासांत उत्तरेकडे सरकण्याचा आणि अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रीवादळात रुपांतर होऊन 8 ते 9 जूनदरम्यान हे चक्रीवादळ तीव्र होऊ शकते. यावेळी समुद्र खवळलेला असेल आणि वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी इतका असू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात धडकले होते. या वादळाला 'मोचा' असे नाव दिले गेले होते. आता अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचे नाव 'बिपरजॉय' असेल. बांगलादेशने हे नाव दिले आहे. कोकणसह, मुंबई, पालघर आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा फटका बसण्याची भीती आहे. या सर्व भागांत यादरम्यान मुसळधार पाऊस पडणार असून मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.