नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, २४ मेपर्यंत हे 'रेमाल' चक्रीवादळ पूर्णपणे तयार होऊन किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू करेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या वादळाचा मान्सूनच्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'रेमाल' चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी वातावरणामुळे ओडिशा व बंगालला मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ २४ मे रोजी पूर्ण विकसित होणार असून, त्यानंतर त्याची आगेकूच सुरू होईल.