भंगार रिक्षाटेम्पोतून सिलिंडर वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:38 PM2019-10-18T23:38:59+5:302019-10-18T23:39:26+5:30
अपघाताचा धोका : आरटीओसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
नवी मुंबई : तुर्भे परिसरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या डिलेव्हरीसाठी भंगार अवस्थेतील रिक्षाटेम्पोचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून दररोज ही वाहने जात असतानाही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. परिणामी, एखादा अपघात झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या डिलेव्हरीसाठी सुस्थितीतील वाहनांचा वापर होणे आवश्यक आहे. शिवाय अशा वाहनांची आरटीओकडून वेळोवेळी तपासणीही होणे आवश्यक आहे. मात्र, व्यावसायिक उद्देशासाठी वापरल्या जात असलेल्या वाहनांच्या बाबतीत आरटीओसह वाहतूक पोलिसांकडून फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त होत असतो. अशातच तुर्भे, सानपाडा परिसरात गॅस सिलिंडरच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे भंगार अवस्थेत असलेल्या रिक्षाटेम्पोचा वापर होताना दिसत आहे. त्याचे निम्याहून अधिक भाग निखळलेले असून ते रस्सीने बांधण्यात आलेले आहेत. त्याशिवाय चालकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींचाही त्यावर अभाव दिसून येत आहे.
सानपाडा येथील गॅस एजन्सीकडून या टेम्पोचा वापर होत असून, तुर्भेसह लगतच्या परिसरातील गॅसग्राहकांपर्यंत त्यामधून सिलिंडर पोहोचवले जात आहेत. यानुसार सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा जंक्शन येथून हा टेम्पो नियमित ये-जा करत असतो. त्याच ठिकाणी सातत्याने वाहतूक पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतो. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून या रिक्षाटेम्पोवर कारवाई होऊ शकलेली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाया फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का? असा प्रश्न तुर्भेतील ग्रामस्थ शरद पाटील यांनी उपस्थित केला आहे; रस्त्यावरील शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घालून धोकादायक स्थितीमध्ये जीर्ण अवस्थेतील टेम्पोतून गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या एजन्सीवर कारवाईची मागणी शरद पाटील यांनी केली आहे.