सिलिंडर, रॉकेलचा काळाबाजार

By admin | Published: October 14, 2015 03:00 AM2015-10-14T03:00:20+5:302015-10-14T03:00:20+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परप्रांतीय कामगारांना बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर व रॉकेल पुरविले जात आहे. सुरक्षा रक्षकांनी दोन दिवस टाकलेल्या धाडीमध्ये

Cylinders, kerosene's black market | सिलिंडर, रॉकेलचा काळाबाजार

सिलिंडर, रॉकेलचा काळाबाजार

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परप्रांतीय कामगारांना बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर व रॉकेल पुरविले जात आहे. सुरक्षा रक्षकांनी दोन दिवस टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल १३ सिलिंडर व शेगड्या आणि तब्बल ५७ स्टोव्ह जप्त केले आहेत. मार्केटमध्ये रॉकेल व गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
बाजार समितीच्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये परप्रांतीय कामगारांनी घुसखोरी केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. मार्केटमध्ये विनापरवाना गॅस व स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक केला जात असल्याचेही निदर्शनास आले होते. या वृत्ताची दखल घेवून बाजार समितीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी १२ व १३ आॅक्टोबरला मार्केटमध्ये कोम्बिंग आॅपरेशन केले. मार्केटमधून पहिल्या दिवशी ११ सिलिंडर, ९ शेगड्या, ४२ स्टोव्ह जप्त करण्यात आले. मंगळवारी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन करून झाडाझडती घेतली असता २ सिलिंडर, ४ शेगड्या व १५ स्टोव्ह जप्त केले आहेत. मार्केटमध्ये ज्या कामगारांची कोणाकडेही नोंद नाही ते येथे चोवीस तास मुक्काम कसे करतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बेकायदेशीरपणे गॅस व स्टोव्हचा वापर केला जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जप्त केलेल्या सिलिंडरमध्ये भारतीय पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडेन गॅसच्या घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा समावेश आहे. ज्या कामगारांचे नाव, पत्ता, वास्तव्याचा काहीही पुरावा नाही त्यांना गॅस कोणी पुरवला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गॅसचा काळाबाजार करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना रेशनिंगवर रॉकेल मिळत नाही. परंतु परप्रांतीय कामगारांना मात्र रॉकेलचा मुबलक पुरवठा केला जात आहे. बाजार समितीमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कामगारांना रॉकेल कोण पुरवतो याचाही शोध सुरू आहे. बनावट पत्त्यांचा वापर करून गॅस मिळविण्यात आल्याची शक्यता आहे.
मार्केटमधील ज्या गाळ्यांमध्ये गॅस सापडले त्या गाळ्यावर कोणाच्याही नावाने गॅस नोंदणी नाही. मग गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांना गॅस सिलिंडर दिलाच कसा अशी विचारणा होत आहे.
गॅस, रॉकेलच्या काळ्याबाजारामध्ये काही माफिया, रेशनिंग दुकानदार व गॅस कंपनीचे कर्मचारी सहभागी असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येवू शकते अशी माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली. ज्यांनी या कामगारांना आश्रय दिला त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Cylinders, kerosene's black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.