२७० दंत खुर्च्यांची परवानगी, मात्र ३५० खुर्च्यांचा वापर; खारघरच्या पोळ फाउंडेशनमधील प्रकार
By नारायण जाधव | Published: February 8, 2023 08:20 PM2023-02-08T20:20:55+5:302023-02-08T20:21:45+5:30
खारघर येथील डी. जी. पोळ फाउंडेशनने आपल्या डेंटल कॉलेजला २७० दंत खुर्च्यांची परवानगी असताना ३५० खुर्च्यांचा वापर सुरू केल्याचे निष्पन्न झाले आहे.
नवी मुंबई: खारघर येथील डी. जी. पोळ फाउंडेशनने आपल्या डेंटल कॉलेजला २७० दंत खुर्च्यांची परवानगी असताना ३५० खुर्च्यांचा वापर सुरू केल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नाही तर संस्थेने १० हजार १७ चौरस मीटरचे वाढीव बांधकाम पर्यावरण विभागाची एनओसी न घेताच केल्याची हरकत प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. यामुळे याचा खुलासा करण्यासह संस्थेचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद सादर करण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. यामुळे फाउडेशनने सादर केलेला वाढीव खुर्च्या वापरण्याचा प्रस्तावही प्रदूषण नियंत्रण मंडळाने तूर्तास नाकारला आहे.
पोळ फांउडेशनचे खारघर सेक्टर ४मध्ये भूखंड १६, १६ अ आणि १८ वर २८,९७२ आणि २४२०७ चौरस क्षेत्रफळावर ४४० खाटांसह ३५० डेंटल खुर्च्यांचे वैद्यकिय महाविद्यालय आहे. यात २७० खुर्च्यांनाच परवानगी आहे. परंतु, त्या ठिकाणी विनापरवानगी ३५० खुर्च्यांचा वापर सुरू असल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यास संमती समितीने काढला आहे. याशिवाय पोळ फाउंडेशनने १० हजार १७ चौरस मीटरचे वाढीव बांधकाम पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच केल्याचे संमती समितीचे म्हणणे आहे.
वाढीव खुर्च्यांसाठी पोळ फाउंडेशनने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवागनी मागितली होती. त्यावेळी मंडळाच्या संमती समितीने आपल्या १८ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत संस्थेच्या अनागोंदी कारभाराविषयी हे गंभीर निष्कर्ष काढले आहेत. यानंतर संमती समितीने १० हजार १७ चौरस मीटरचे वाढीव बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली होती, का अशी विचारणा करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्यासह फाउंडेशनचा लेखा परीक्षण केलेला ताळेबंद सादर करण्यास सांगून संस्थेने मागितलेली वाढीव खुर्च्यांची मंजुरी तूर्तास नाकारली आहे.
विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिलेल्या या दणक्यानंतर पोळ फाउंडेशनच्या दंत महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी काय पवित्रा घेतात, पर्यावरण परवानगी न घेता केलेल्या वाढीव बांधकामाबाबत फाउंडेशन आता काय खुलासा करते यासह लेखा परीक्षण केलेल्या ताळेबंद सादर करते किंवा नाही, याकडे लक्ष लागले आहे.