नवी मुंबई : नवजात मातेचे दूध बालकांना आवश्यक असते; परंतु अनेक कारणांमुळे बाळाला मातेचे दूध मिळत नाही. नवजात बालकांना मातेच्या दुधापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात अतुल्य अमृत दूधपेढी हा सामाजिक उपक्रम संस्थेच्या विश्वस्त शिवानी विजय पाटील यांच्या पुढाकाराने मोफत सुरू करण्यात आला आहे.
नवजात बालकाला जन्म देणाऱ्या मातेच्या शारीरिक कमरतेमुळे अनेक वेळा दूध कमी येते, तसेच विविध कारणांमुळे नवजात बालकांना मातेचे दूध उपलब्ध होत नाही. त्याउलट काही मातांना आवश्यकतेपेक्षा जास्त दूध येते. बाळाला पोटभर स्तनपान केल्यानंतर उरलेले दूध काढावे लागते, कारण बहुतेक वेळा मातांना त्याचा त्रास होतो, अशा वेळी हे वाया जाणारे दूध गरजू बाळांना देऊन त्यांची भूक भागविता यावी, या उद्देशाने रु ग्णालयात अतुल्य अमृत दूधपेढी सुरू करण्यात आली आहे. या पेढीमधील यंत्रणा रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सी साइड यांनी उपलब्ध करून दिली असून, ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्र माच्या उद्घाटन प्रसंगी डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, कुलगुरू डॉ. शिरीष पाटील, रु ग्णालयाचे सीईओ डॉ. अनुपम करमाकर, अधिष्ठाता डॉ. सुरेखा पाटील, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सी साइडचे अध्यक्ष बी. व्ही. रविप्रकाश आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.