नवी मुंबई : अति हिमवृष्टीमुळे मनालीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, त्यामध्ये नवी मुंबईचे सुमारे २०० विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. सर्व जण नेरुळच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. त्यांची मनाली येथे शैक्षणिक सहल गेली आहे. अति हिमवृष्टीमुळे हवेतील ऑक्सिजन कमी होऊन अनेकांना श्वास घेण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे चौघांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दोन दिवसांपासून मनाली व लगतच्या परिसरात अतिहिमवृष्टी सुरू आहे. यामुळे दुर्घटना घडत असून, रहदारीचे रस्तेही बंद झाले आहेत. याबाबत कॉलेजच्या बीबीएचे प्रमुख गोपाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगत अधिक माहितीस नकार दिला. मनालीत अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही मुक्कामाच्या हॉटेलपासून वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्याचेही समजते. ते फिरण्यासाठी गेले असता, झालेल्या हिमवृष्टीमुळे, अपघातांमुळे रस्ते बंद झाल्याने ते हॉटेलपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
ग्रुपमध्ये हाणामारीमनातील अडलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी होऊन तीन विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याबाबत कॉलेजकडून अधिक़ृतपणे काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
- संपूर्ण प्रकाराबद्दल कॉलेज व्यवस्थापनाकडून पालकांना काहीही कळवण्यात आले नव्हते. काही विद्यार्थ्यांनी आपण अडकल्याची माहिती पालकांना दिल्यानंतर इतरही पालकांना त्याची माहिती मिळाली. - पालकांची चिंता वाढली असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांनाही व्यवस्थापनाकडून कोणते ठोस उत्तर दिले जात नसल्याचेही पालकांनी लोकमतला सांगितले. पालकांनी त्यांची नावे उघड करू नये, अशी विनंती केली.