खारघर येथे बँकेवर दरोडा, पोलिसांनी बारा तासाच्या आत केली तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 11:01 PM2017-09-14T23:01:28+5:302017-09-14T23:01:40+5:30
खारघर येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. बँकेतील लॉकर न तुटल्याने करोडो रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली आहे. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता.
नवी मुंबई, दि. 14 - खारघर येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. बँकेतील लॉकर न तुटल्याने करोडो रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली आहे. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता.
खारघर सेक्टर ३० येथील कॅनरा बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. बुधवारी मध्यरात्री बँकेचे शटर उचकटून दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी खबरदारी म्हणून बँकेतील सर्व सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्या होत्या. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांना बँकेतील रक्कम जमा असलेला लॉकर तोडता आला नाही. अखेर दरोड्याचा डाव फसल्यानंतर पळ काढताना त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता. गुरुवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर खारघर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन थोरात, उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार शंकर जाधव, उमेश नवरे, किरण म्हात्रे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून तपास सुरु असताना त्याच रात्री परिसरात चोरटयांनी एक टपरी देखील फोडलेली असल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी मिळालेल्या काही सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी तात्काळ एका संशयिताला ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीत त्याने साथीदारांसह टपरी व बँकेवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. यानुसार इर्शाद अन्सारी (२०), रोहित मोरे (२२) व मुकेश आडे (२०) यांना गुरुवारी रात्री अटक केली आहे. तिघेही खारघरचे राहणारे असून गुन्हेगारी पार्शवभूमीचे आहेत. त्यांना बारा तासाच्या आत अटक करून खारघर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. मात्र त्यांनी बँकेचा डीव्हीआर कुठे टाकला याची माहिती पोलिसांना अद्याप दिलेली नसून खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.