नवी मुंबई : गोविंदांच्या उत्साहात भर टाकणारा दहीहंडी उत्सव शहरात शांततेत व शिस्तबद्धरीत्या साजरा झाला. पश्चिम महाराष्टÑातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मंडळांनी त्यांच्या हंडी रद्द केल्या होत्या. त्यामुळे शहराबाहेरून आलेल्या गोविंदा पथकांची हंडींच्या शोधात तारंबळ उडाली होती. पनवेलमध्येही गोविंदा पथकांची हंडी फोडण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहायला मिळाली.
प्रतिवर्षी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी सण साजरा केला जातो. ऐरोली, कोपरखैरणे, वाशी व नेरुळमध्ये लाखोच्या बक्षिसांच्या हंडी रचल्या जातात. त्या फोडण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व लगतच्या इतर शहरातील पथके नवी मुंबईत हजेरी लावत असतात. या वेळी प्रतिष्ठेच्या हंडी फोडण्याच्या स्पर्धेतून गोविंदा पथकांकडून रचले जाणारे मानवी मनोरे पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक एकत्र जमत असतात. मात्र, यंदा शहरात हे मानवी मनोरे पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नवी मुंबईकरांसह राज्यभरातून मदतीचा हात मिळत आहे. याच पूरपरिस्थितीची दखल घेऊन शहरातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मोठ्या हंडी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोपरखैरणेतील वनवैभव कला क्रीडा निकेतन, ऐरोलीतील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन व वाशीतील श्री गणेश बाल गोपाळ मित्रमंडळ या आयोजकांचा समावेश आहे. त्यांनी हंडी रद्द करून त्यावर होणारा खर्च पूरबाधितांच्या मदतीसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तर परिमंडळ एक मधील स्थानिक पातळीवरील केवळ २९ हंडी रचण्यात आल्या होत्या. त्यांनीही सामाजिक बांधीलकी जपत अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला. तर एपीएमसी भाजी मार्केट आवारात व्यापाऱ्यांकडून आयोजित केली जाणारी हंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.बापटवाड्यात तीन शतकांची परंपरापनवेलमधील बापटवाड्यातील दहीहंडी उत्सवाला तीन शतकांची परंपरा आहे. १७२० मध्ये बाळाजीपंत बापट आपल्या कुटुंबासह पनवेलमध्ये आले होते. त्यांनी १७३० पासून हा उत्सव सुरू केला. पंढरपूरवरून आणलेल्या विठ्ठल मूर्तीची स्थापना केली होती. गोकुळाष्टमीच्या दिवशी बापटवाड्यात असलेल्या देव-देवतांची अभिषेक करून सजावट केली जाते. आदल्या दिवशी रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आयोजित केले जातात. पनवेल शहरात नवनाथाची शक्तिपीठ आहेत. त्या ठिकाणचे भक्त या उत्सवात सामील होऊन या ठिकाणच्या दहीहंडी फोडत असतात. विशेष म्हणजे, येथील दहीहंडी ही मोठ्या उंचावर न बांधता ठरावीक उंचीवर दहीहंडी टांगून सर्व जण रिंगणामध्ये एकत्र येत असतात. गोलाकार जमलेल्या गोविंदांना जाड्या दोरखंडाने फटके मारले जातात. हा एक परंपरेचाच भाग असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते.
मानाच्या हंडी फोडण्यासाठी आम्ही प्रतिवर्षी नवी मुंबईत येतो. त्यानुसार दिवसभरात सात ते आठ हंडी फोडण्याचा मान पटकावत असतो. मात्र, यंदा बहुतांश मोठ्या हंडी रद्द झाल्याने छोट्या हंडींकडे पथक वळवावे लागले. त्यांचीही संख्या कमी असल्याने दिवसभरात केवळ चार हंडी फोडल्या.- अमोल तांदळे, बापदेव पथक, देवनार