धूलिकणांमुळे शहरवासी हैराण; प्रदूषणामध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:44 AM2019-04-22T01:44:23+5:302019-04-22T01:44:37+5:30
आरोग्यावर परिणाम; विकासकामांमुळे धुळीचे साम्राज्य
- नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमधील नागरिक वायूप्रदूषणामुळे त्रस्त होऊ लागले आहेत. धूलिकणांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम सहन करावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देशातील पहिल्या स्मार्ट सिटीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. सिडकोने यापूर्वीच पनवेलसह दक्षिण नवी मुंबईच पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली होती. ‘नैना’ परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा केली आहे. देशातील राहण्यायोग्य शहरामध्येही नवी मुंबईचा समावेश झाला असून, स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय स्तरावर सातवा व राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. शहरात सर्व काही चांगले असल्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात प्रदूषणाची स्थिती गंभीर होऊ लागली आहे.
खाडी प्रदूषित होत आहे. कारखान्यांमधील पाणी नाल्यात सोडले जात आहे. पनवेल परिसरामध्ये सांडपाणी चक्क नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या प्रदूषणामध्ये आता वायू प्रदूषणाचाही समावेश आहे. दोन्ही महापालिका व औद्योगिक क्षेत्रामध्ये धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. ऐरोली परिसरामध्ये ३१ पैकी २० दिवस धूलिकणांचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. हवेतील आरएसपीएम १० ची मात्रा सरासरी १०० घनमीटर असणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश ठिकाणी ती ११० ते १४० पर्यंत गेली आहे.
शहरामध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढत आहे. पनवेल परिसरामध्ये विमानतळासाठी भरावाचे काम वेगाने सुरू आहे. भरावामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल ते उरण महामार्गाचे रुंदीकरणही सुरू आहे. याशिवाय रस्ते, गटार व इमारतींचे बांधकामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महामार्गासह एमआयडीसीमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आहे. धूळ साफ करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे वाहनांमुळे रोडवरील धूलिकण हवेत जात आहेत. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. दुचाकीवरून जाणाºया नागरिकांच्या डोळ्यात धूळ जात आहे. डोळ्यांची जळजळ होत असून अनेक वेळा धुळीचे मोठे कण डोळ्यात गेल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोड, ठाणे-बेलापूर व अंतर्गत रोडची यांत्रिकीपद्धतीने साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे; परंतु बहुतांश अंतर्गत रोडवर वाहने उभी असल्याने साफसफाई करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पनवेल परिसरामध्ये रोड साफ करण्यासाठी काहीही यंत्रणा नसल्यामुळे प्रदूषण वाढत असून प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या उपाययोजना
महापालिकेने शहरातील प्रमुख रोडची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई सुरू केली आहे. दुभाजकांच्या मध्ये वृक्षलागवड व हिरवळ विकसित केली आहे. रोडच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केली आहे. दगडखाणी बंद असल्यामुळे प्रदूषण काही प्रमाणात थांबले आहे. ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे व नेरुळमध्ये हवा गुणवत्ता तपासणी केंद्र उभारले आहे. पालिका उपाययोजना करत आहे; परंतु सायन-पनवेल महामार्गाची साफसफाई केली जात नसल्याने धूलिकण वाढत आहेत. पनवेलमध्येही रोडच्या साफसफाईकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
धूलिकणांमुळे नागरिकांना श्वसनाचे व हृदयविकाराचे आजार होण्याची शक्यता आहे. जागतिक आकडेवारीनुसार धूलिकणांचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुप्फुसांचा कर्करोग, श्वसननलिका, दीर्घकालीन श्वसनाचे आजार होण्याची शक्यता वाढत आहे. यामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.