सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : नेरुळ येथील कोविड सेंटरमध्ये हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या कामगारांच्या पगारावर डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे. काम करूनही अनेकांचे पूर्ण महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही, तर काहींच्या पगारातून ५ ते ३ हजार रुपये कापून घेण्यात आले आहेत. हे वेतन मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही कामगारांच्या पदरी निराशाच पडली आहे.
मागील काही दिवसांपासून पालिकेचे कोविड सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडू लागले आहे. कोरोनाच्या आडून मलिदा लाटला जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच कोविड सेंटरमधल्या कामगारांच्या वेतनावरही डल्ला मारला जात असल्याची बाब समोर आली आहे.
ठेकेदारामार्फत नेमलेल्या नेरुळ सेक्टर ९ येथील अहिल्याबाई होळकर सेंटरमधील हाउसकीपिंग कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. सुरुवातीला सपोर्ट फॅसिलिटीमार्फत कामगार नेमण्यात आले होते. ऑगस्टमध्ये त्यांच्याकडून काम काढून डी.एम. ग्रुप यांना देण्यात आले, परंतु नोव्हेंबरमध्ये शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने, इतर काही केंद्रांसह नेरुळचे केंद्रही बंद करण्यात आले. यावेळी काही कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन न देताच घरचा रास्ता दाखविण्यात आला, तर काहींच्या वेतनातून ३ ते ५ हजार रुपये कापल्याचा आरोप होत आहे.
सपोर्ट फॅसिलिटी कंपनीनेही जुलै महिन्याच्या वेतनातून प्रती कामगार ५ हजार रुपये कापल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कोणत्याही कारणाशिवाय कापलेला पगार मिळविण्यासाठी मागील एक महिन्यापासून हे कामगार ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांकडे विनवण्या करत आहेत.
काही सुपरवायझरचे वेतन थांबविल्याचा आरोप कोरोनाच्या भीतीमुळे कोविड सेंटरमध्ये कामगार मिळत नसतानाही आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांनी धोका पत्करला होता. त्यांच्याच पगारावर डल्ला मारून स्वतःचे खिशे भरले जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे, परंतु संपूर्ण प्रकार सपोर्ट फॅसिलिटी ठेकेदारामार्फत घडला असून, आपण सर्वांचे वेतन अदा केले असल्याचे डी.एम. ग्रुपचे प्रवीण सेनेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनीही काही सुपरवायझरचे वेतन थांबविले असल्याचा कामगारांचा आरोप आहे.