औषधी वनसंपत्तीचे नुकसान

By admin | Published: March 30, 2017 06:54 AM2017-03-30T06:54:39+5:302017-03-30T06:54:39+5:30

रायगड जिल्हा हा सुंदर आणि वातावरणात समतोल राखणारा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या

Damage to medicinal plants | औषधी वनसंपत्तीचे नुकसान

औषधी वनसंपत्तीचे नुकसान

Next

सुनील बुरूमकर / कार्लेखिंड
रायगड जिल्हा हा सुंदर आणि वातावरणात समतोल राखणारा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आणि वृक्ष आहेत. नैसर्गिक संपत्ती समजल्या जाणाऱ्या वनांमधून औषधी वनस्पतीचे नुकसान होत आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नैसर्गिक हानी आणि औषधी वृक्षांचा चुकीच्या पद्धतीने वापर यामुळे जैवविविधता नष्ट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्या जिल्ह्यातील ठेकेदार आणि संबंधित वनविभागातील कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षमित्र व अनेक संघटनांकडून होत आहे.
जिल्ह्यातील पेण तालुक्याला साधारणत: आठ हजार हेक्टर जागा ही वनांनी व्यापलेली आहे. त्यामुळे पेण तालुक्याला डोंगरी भाग म्हणून संबोधले जाते. या तालुक्यातील वनांमधून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात; परंतु त्यांची नोंद पेण वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयात दिसत नाही. या औषधी वनस्पतीपैकी या तालुक्यात ‘सालडोन’ नावाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. यालाच दुसरे नाव ‘कांड्रोल’ हेसुद्धा आहे. या वृक्षाच्या खोडातून एक चिकट पदार्थ काढला जातो. यालाच गोंद किंवा डिंक म्हटले जाते. याचा उपयोग औषध आणि खाद्य पदार्थांसाठी के ला जातो. त्यामुळे हे डिंक काढण्यासाठी लिलावामार्फत बोली केली जाते. ते ठरलेल्या महसुलाप्रमाणे डिंक काढायचा असतो व महसूल जमा करायचा असतो. तसेच हा डिंक काढण्यासाठी या वृक्षाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून विशिष्ट पद्धत वापरली जाते; परंतु या गोष्टी फक्त कागदावरच राहतात. प्रत्यक्षात याकडे लक्षच दिले जात नाही.
पेण तालुक्यातील वृक्षमित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. लिलावातील कोणतीही गोष्ट लेखी स्वरूपात घेतली जात नाही. या वृक्षापासून डिंक काढण्यासाठी पद्धत अशी आहे की, या वृक्षाला अर्धा इंच खाच केली जाते. त्यातून डिंक बाहेर येतो. मात्र, पेणमधील धावटे, गणपतीची वाडी या गावाशेजारील वनात सालडोनच्या झाडांना अक्षरश: अर्धा फुटांचे खिळे मारले आहेत. हे खिळे एका झाडावर चाळीस ते पन्नास ठिकाणी मारलेले दिसत आहेत. खिळे मारलेल्या जागेतून आठवड्यातून दीड ते दोन किलो डिंक बाहेर काढला जातो. पुन्हा महिन्यानंतर खिळे मारलेली जागा झाड भरून काढते. नंतर हे लोक दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे खिळे झाडामध्ये घुसवतात. हे एक प्रकारे वृक्षावर अत्याचार करण्यासारखे आहे. जर का या वृक्षावर असे जीवघेणे घाव होत असतील, तर या जातीचे वृक्ष कालांतराने नष्ट होतील, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी आताच्या परिस्थितीला ती शेकड्यांमध्ये येऊन पोहोचली आहेत. याला कारण येथील वनविभागाचे अधिकारी व वनपाल, वनरक्षक आहेत.
या विभागातील डिंक काढण्याचा ठेका सलाम हसन दुस्ते या व्यक्तीला देण्यात आला आहे. त्यांनी प्रत्यक्ष ताबा १७ आॅक्टोबर २०१६ पासून घेतला आहे. दर पंधरा दिवसांनी डिंक काढल्याचा अहवाल कार्यालयाला द्यायचा असतो आणि आज पाच महिने झाले तरी डिंक काढल्याचा अहवाल या ठेकेदाराने दिलेला नाही. तसेच ठेकेदारास ठेका मंजूर केलेल्या पत्रावर ठरलेल्या रकमेचा आकडाही दिलेला दिसत नाही. पेणमधील वृक्षमित्रांनी याबाबत चौकशी सुरू केल्यामुळे तसेच ही गोष्ट वनपाल यांच्या निदर्शनास आणून देत या ठेकेदारास का पकडले नाही, अशी विचारणा केली आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी डिंक काढणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांकडून काढलेला डिंक जमा केला आहे; परंतु दुस्ते नावाच्या ठेकेदाराने पळ काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

कामगारांना डिंक काढण्याचे प्रशिक्षणच नाही

झाडामधून कशा पद्धतीने गोंद काढली पाहिजे, याबाबत प्रशिक्षण कामगारांना देणे ठेकेदाराची जबाबदारी असते. ते दिले आहे की नाही. किती सालडोन जातीचे वृक्ष या वनात आहेत, तसेच किती गोंद काढली जाते. याबाबत कोणतीही माहिती वनअधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही.
वनखात्याच्या वनपाल व वनरक्षक या कर्मचाऱ्यांकडे पीडीए नावाचे एक सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. त्यामुळे वनामध्ये फिरताना या कर्मचाऱ्याची नोंद होते. तसेच एखाद्या स्थळी एखादा गुन्हा झाला असेल, तर ते गुगल कार्यालयात दिसते. अशी यंत्रणा सद्यस्थितीत ८० टक्के कर्मचाऱ्यांकडेसुद्धा उपलब्ध नाही. यासाठी शासनाकडून आठ हजार रुपये तीन वर्षांसाठी खर्च म्हणून दिले जातात; परंतु याचा प्रत्यक्षात उपयोग होताना दिसत नाही.


रायगड जिल्ह्यातील वनक्षेत्रातील जे ठेकेदार आहेत त्यांची निविदा वृत्तपत्रात छापावी. वनविभागातील झाडपाला डिंक याचे ठेके दिलेत त्यांची माहिती सुद्धा वृत्तपत्रात छापावी. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत आणि याच वनस्पतींचा गोंद काढण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या कोणत्याच झाडाला हात लावू नये, असे होत नाही. ज्या वेळी लिलाव करतात त्या झाडांची संख्या उपलब्ध नाही. त्यातून किती गोंद मिळेल याचाही हिशोब नाही. ठेकेदार माल काढतो. त्या वेळी वनपालच्या समोर मोजमाप केले पाहिजे. महसूल जमा केल्यावर अधिकृत पास देऊन त्याच्याकडे ताबा दिला पाहिजे. यापैकी कोणतीही लेखी कार्यवाही या विभागातून झालेली नाही.
- प्रा. उदय मानकवळे,
वृक्षमित्र


सलाम दुसते या ठेकेदारस बोलावून जागेवर जावून पंचनामा करण्यात आला आहे. जबाब घेतला आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- एस. आर. पवार,
वनक्षेत्र अधिकारी पेण तालुका

Web Title: Damage to medicinal plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.