बांधकामांच्या साहित्यामुळे पदपथांचे नुकसान; नव्याने दुरुस्ती केलेल्या गटारांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:21 AM2019-05-17T00:21:17+5:302019-05-17T00:21:34+5:30
सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील पदपथे व गटारांवर ठेकेदारांनी अवैधरीत्या कब्जा मिळवला आहे. बांधकामांचे साहित्य साठवण्यासाठी सर्रासपणे पदपथांसह वापर होत असल्याने, अनेक ठिकाणी त्याची पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणाप्रमाणेच पदपथांवर ठेकेदारांनी साठवलेले साहित्य हटवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यात बैठ्या चाळीतील घरांच्या पुनर्बांधणीसह मोठमोठ्या इमारतींचा समावेश आहे. या विकासकामांमुळे परिसरातील पदपथ व गटारांची हानी होताना दिसून येत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेले पदपथ व सांडपाणी वाहण्यासाठी तयार केलेली गटारे जणू ठेकेदारांना आंदण दिल्याचा भास सर्व नोडमधील परिस्थितीवरून सर्वसामान्यांना होत आहे. ज्याठिकाणी घरांची अथवा इमारतींची बांधकामे सुरू आहेत, त्या परिसरातील गटारांसह पदपथांची दुरवस्था झाल्याचे पाहावयास मिळत आहे. बांधकामाचे साहित्य साठवण्यासाठी खासगी ठेकेदारांकडून नागरिकांच्या वापराच्या पदपथांचा तसेच गटारांचा वापर केला जात आहे. त्यामध्ये दगड, वाळू व विटांसह बांधकामासाठी लागणाºया इतर साहित्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी सिमेंट व खडी एकत्र करण्याच्या छोट्या मशिन, पाण्याच्या टाक्या यासह इतर जड साहित्य पदपथांवर ठेवले जात आहे. यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होत आहेच, शिवाय पदपथांसह गटारांचेही नुकसान होताना दिसून येत आहे. अनेकदा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले साहित्य ठेकेदारांकडून त्याच ठिकाणी सोडून दिले जाते. यामुळेही गटारांमध्ये वाळू साचून पावसाळ्यात सांडपाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होवून परिसर जलमय होण्याचेही प्रकार घडत असतात. तर काही महिन्यांपूर्वी सीबीडी बेलापूर येथील आर्टिस्ट व्हिलेज परिसरात अशाच प्रकारातून पदपथ खचल्याचाही प्रकार घडला होता. त्यानंतरही परिसरातील पदपथांवर मोठ्या प्रमाणात बांधकामांचे साहित्य साठवल्याचा प्रकार पहायला मिळत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी विभाग अधिकाºयांकडे तक्रार करूनही ते हटवले जात नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोपरखैरणे परिसरात देखील मोठ्या प्रमाणात हा प्रकार पहायला मिळत आहे. प्रतिवर्षी उन्हाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळीच्या घरांच्या वाढीव बांधकामाला सुरवात होते. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने सुरू असलेल्या या बांधकामांचे साहित्य जागोजागी पदपथांवर, रस्त्यावर तसेच गटारांवर साठवले जाते.
गतमहिन्यात अशाच प्रकारातून जागोजागी वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा ठेकेदारांना नोटिसा देखील बजावल्या होत्या. परंतु पालिका अधिकाºयांकडून ठोस कारवाई होत नसल्याने सार्वजनिक वापराचे पदपथ ठेकेदारांना आंदण दिल्याचा संशय सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
अपघाताची शक्यता
खासगी बांधकामांच्या ठेकेदारांसह पालिकेची विकासकामे करणाºया ठेकेदारांकडूनही हाच प्रकार सुरू आहे. घणसोलीत अमृत योजनेअंतर्गत पालिकेच्या वतीने नाल्यालगत हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे. त्याकरिता नाल्याभोवती पिचिंगचे काम सुरू असून, त्यासाठी लागणारे मोठमोठे दगड पदपथासह निम्म्या रस्त्यावर साठवण्यात आले आहेत. यामुळे पादचाºयांना अडथळा होत असतानाही लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकाºयांचे तिथल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्याठिकाणी अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.