पावसाने शेतीचे नुकसान, महामुंबईत कांदा दरात वाढ, गारपिटीचा फळांनाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:23 PM2023-11-29T13:23:13+5:302023-11-29T13:23:31+5:30
Onion Prices : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका आहे. पावसाने कांद्याचेही मोठे नुकसान झाल्यामुळे मुंबईत बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे, मात्र भाजीपाल्यांची आवक अजून सुरळीत आहे.
नवी मुंबई - अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका आहे. पावसाने कांद्याचेही मोठे नुकसान झाल्यामुळे मुंबईत बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे, मात्र भाजीपाल्यांची आवक अजून सुरळीत आहे. पावसामुळे शेतीचे किती नुकसान झाले, याचा अंदाज पुढील काही दिवसांमध्ये येईल.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा कांदा पिकाला फटका बसला आहे. यामुळे मुंबईमधील आवक घटली. मंगळवारी ६२३ टन आवक झाली. गेल्या आठवड्यात कांदा प्रतिकिलो २८ ते ३८ रुपये दराने विकला जात होता. आता हे दर ३० ते ४६ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० रुपयांवर गेला आहे. पुढील काही दिवस कांद्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसामुळे फळे खराब होण्याचे प्रमाण पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कांदा व फळांच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक सुरळीत आहे. मंगळवारी ४८६ २९९७ टन भाजीपाल्यांची आवक झाली असून ४ लाख ९५ जुडींचा समावेश आहे.
नाशिकसह इतर ठिकाणी कांद्याचे नुकसान झाले. यामुळे मंगळवारी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली. - किशोर ठिगळे, व्यापारी
अवकाळी पावसाचा द्राक्ष, स्ट्रॉबेरी व इतर फळांना फटका बसला आहे. यामुळे फळे खराब होण्याची शक्यता आहे.
- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
भाजीपाला मार्केटमध्ये आवक सुरळीत सुरू आहे. अवकाळी पावसाचा अद्याप आवकेवर खूप परिणाम झालेला नाही. गुजरात, मध्य प्रदेश व इतर ठिकाणावरूनही आवक होत आहे.
- शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट