पावसामुळे कांद्यासह फळांचे नुकसान, भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरू
By नामदेव मोरे | Published: November 28, 2023 05:58 PM2023-11-28T17:58:09+5:302023-11-28T17:59:04+5:30
नाशिकसह पुणे व इतर परिसरामध्ये झालेल्या पावसाचा कांदा पिकावर परिणाम झाला आहे.
नवी मुंबई : राज्यातील अवकाळी पावसाचा फटका कृषी मालालाही बसला आहे. कांद्याचे नुकसान झाले असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवक मात्र अद्याप सुरळीत असून पावसाचा नक्की काय परिणाम झाला हे पुढील काही दिवसामध्ये स्पष्ट होईल.
नाशिकसह पुणे व इतर परिसरामध्ये झालेल्या पावसाचा कांदा पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईमधील आवक घटली आहे. मंगळवारी ६२३ टन आवक झाली आहे. गत आठवड्यात कांदा प्रतीकिलो २८ ते ३८ रुपये दराने विकला जात होता. आता हे दर ३० ते ४६ रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० रुपयांवर गेला आहे. पुढील काही दिवस कांद्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाचा फळांवरही परिणाम झाला आहे. द्राक्ष, डाळींब, कलींगड, अंजीर, स्ट्रॉबेरीच्या फळांचे नुकसान झाले आहे. फळे खराब होण्याचे प्रमाण पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांदा व फळांच्या तुलनेमध्ये भाजीपाला मार्केटमधील आवक सुरळीत सुरू आहे. मंगळवारी ४८६ वाहनांमधून २९९७ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ९५ जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.
नाशिक सह इतर ठिकाणी कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे मंगळवारी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
किशोर ठिगळे, व्यापारी
अवकाळी पावसाचा द्राक्ष, स्ट्रॉबेरी व इतर फळांना फटका बसला आहे. यामुळे फळे खराब होण्याची शक्यता आहे.
संजय पानसरे, संचालक फळ मार्केट
भाजीपाला मार्केटमध्ये आवक सुरळीत सुरू आहे. अवकाळी पावसाचा अद्याप आवकवर खूप परिणाम झालेला नाही. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश व इतर ठिकाणावरूनही आवक होत आहे.
शंकर पिंगळे, संचालक भाजीपाला मार्केट