धरणा कॅम्प शाळा पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: July 27, 2015 02:42 AM2015-07-27T02:42:26+5:302015-07-27T02:42:26+5:30
कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन सरकारने केलेच नाही. पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील
अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन सरकारने केलेच नाही. पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील शाळेचीही दुरवस्था झाली असून जिल्हा परिषदेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने ८५ विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
१९६१ साली सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करंजावडे गावातून कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे स्थानिक मंडळी बाधित झाली. सरकारने त्यातील काही कुटुंबांचे पुनर्वसन पनवेल तालुक्यातील रोहिंजन गावालगत केले. भवानीनगर म्हणून ओळखला जाणारा हा धरणाकॅम्प सध्या अनेक समस्यांनी त्रस्त आहे. या ठिकाणी तीन वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविली जात असली तरी तिन्हींची दुर्दशा झाली आहे. एक वर्ग तर पूर्णत: मोडकळीस आला असल्याने या ठिकाणी मुलांना बसविण्यात येत नाही. दुसऱ्या दोन खोल्यात शाळा भरविली जात असून त्या छताला गळती लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वर्गावर ताडपत्री टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले आहेत, वर्गखोल्यांच्या लाद्याही उखडल्या आहेत. अनेकदा विद्यार्थी त्यात अडकून पडतात. येथील शौचालयाची स्थिती अतिशय वाईट असून त्याला दरवाजे नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या संदर्भात अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचे सहसचिव आर.टी.कदम यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शिवाय वारंवार पाठपुरावाही केला आहे, तरी सुध्दा त्वरित उपाययोजना केल्या जात नाही. तीनही वर्गखोल्या जमीनदोस्त करून नवीन इमारत बांधण्याची आमची मागणी असल्याचे ग्रामस्थ संदीप पवार यांनी सांगितले.