बारबालांच्या शारीरिक कष्टावर अधिकारी मालामाल; पोलिस आयुक्त खंबीर, अधिकारी नाहीत गंभीर?

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 12, 2024 09:27 AM2024-03-12T09:27:37+5:302024-03-12T09:27:55+5:30

या वरकमाईवर नजर ठेवूनच अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईत बदलीसाठी स्पर्धा लागत आहे.

dance bar in navi mumbai police commissioner strong officers not serious | बारबालांच्या शारीरिक कष्टावर अधिकारी मालामाल; पोलिस आयुक्त खंबीर, अधिकारी नाहीत गंभीर?

बारबालांच्या शारीरिक कष्टावर अधिकारी मालामाल; पोलिस आयुक्त खंबीर, अधिकारी नाहीत गंभीर?

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई: पनवेलसह शहरातील बहुतांश डान्सबारच्या आडून उघडपणे देहविक्री होत आहे. नोकरनाम्याच्या अधिक पटीने महिलांना कामावर ठेवले जात आहे. त्यांना देहविक्रीसाठी वापरले जाते. त्यांच्या जीवावर पोलिस अधिकारी खिसे भरत आहेत. या वरकमाईवर नजर ठेवूनच अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईत बदलीसाठी स्पर्धा लागत आहे.

'लोकमत'ने 'मुक्काम पोस्ट महामुंबई मधून सोमवारी 'डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी चलो पनवेल' यातून पनवेल परिसरात चालणाऱ्या गोरखधंद्यावर प्रकाश टाकला होता. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासारखे खंबीर अधिकारी असताना त्यांच्या हाताखाली अधिकारी गंभीर का नाहीत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पहाटेपर्यंत डान्सबार, सर्व्हिस बार चालू आहेत. त्यासाठी दरमहा कोट्यवधींची देवाणघेवाण होत आहे त्यामुळेच नवी मुंबईत पोस्टिंगसाठी मोठी आर्थिक स्पर्धाही घडत आहे. तर, काहींना कार्यकाळ संपूनही बदली स्वीकारणे जड जात आहे. अशा अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे जुन्या मुंबई-पुणे मार्गालगत रात्रीच्या वेळी 'पटाया'सारखी परिस्थिती निर्माण होत चालल्याचे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.

बड्या अधिकाऱ्यांच्या भागीदारीची चर्चा

ऑर्केस्ट्रा बारला रात्री १:३० पर्यंत, तर सर्व्हिस बारला रात्री ९:३० पर्यंत अनुमती आहे. परंतु 'देणेघेणे' व्यवस्थित चालू असल्याने बहुतांश ऑर्केस्ट्रा बार डान्सबार म्हणून पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत चालवले जात आहेत. सर्व्हिस बारमध्ये बारबाला निवडून त्यांना जवळपासच्या लॉजवर सर्व्हिस' देण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे लॉजचे प्रमाणही वाढले असून, काही अधिकान्यांनी त्यांचा काळा पैसा लॉजच्या भागीदारीत गुंतवल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. हे अर्थचक्र सुरू असतानाच अधूनमधून डान्सबारवर वसुलीसाठी कारवाई केली जाते. परंतु, दुसयाच दिवशी पुन्हा तिथे अधिक जोमात छमछम सुरु होते.

दोन विभागांत समन्वयाचा अभाव

बारला उत्पादन शुल्क विभागाचा परवाना असल्याने ठोस कारवाईचा अधिकारही त्यांचाच आहे. यामुळे ठोस कारवाईसाठी पोलिसांकडून बारचा अहवाल उत्पादन शुल्क विभागाला पाठवला जातो. त्यावरही निर्णय होत नसल्याने डान्सबारचे धागेदोरे थेट वरपर्यंत असल्याचे उघड दिसून येते. तर, पोलिस आयुक्त मिलिद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर परिस्थिती आटोक्यात होती. परंतु, कालातराने जैसे थे झाल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

मालकांपर्यंत हात पोहोचतील का?

पोलिसांकडून अनेकदा डान्सबारवर कारवाई केली जाते. वामध्ये केवळ मॅनेजर व वेटरवर गुन्हे दाखल करून बार मालकांना पाठीशी घातले जाते. त्यामुळे पोलिसांचे कागदोपत्री तरी बार मालकापर्यंत हात पोहोचतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

नोकरनामा नावालाच

ऑर्केस्ट्रा किंवा सर्व्हिस बारसाठी नोकरनामा बनवताना जागेनुसार १० ते १५ महिलांचा नोकरनामा केला जातो. प्रत्यक्षात त्या ठिकाणी ३० ते ५० महिला कामावर असतात. अनेक कारवायामुळे हे उघडकीस आले आहे.

पनवेल परिसरच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबई परिसरातील लेडीज बारसह उशिरापर्यंत चालणाऱ्या बारवर कारवाईचे आदेश पुन्हा एकदा दिले आहेत. यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. - मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई.

पोलिसांना इतर अवैध धंदे कळतात. तर डान्सबार का दिसत नाहीत? शहरातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तरीही संपूर्ण चित्र समोर येऊ शकते. आरबीआयने रात्री दीडनंतर होणारे ऑनलाइन व्यवहार तपासल्यास संपूर्ण खेळ उघड होईल. - विनय मोरे, सामाजिक कार्यकर्ता

बारबालेवरून मारहाण करत बारचालकावर रोखले पिस्तूल; वाशीच्या मधुबन बारमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: बारबालेवरून असलेल्या जुन्या वादातून बारचालकाला मारहाण करून त्याच्यावर पिस्तूल रोखल्याची घटना वाशीत घडली आहे. या प्रकरणी दोघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शहरात चालणाऱ्या अवैध डान्सबारमुळे सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. रविवारी रात्रीदेखील वाशीत अशाच एका घटनेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वाशीतील मधुबन बारचे चालक स्वप्निल मोरे यांना रविवारी रात्री ११ च्या सुमारास मारहाण झाली. ते बारच्या खाली उभे असताना मनोज खंडेलवाल त्याठिकाणी आला होता. यावेळी त्याच्यासोबत रितेश सिंग व मधुबन बारमध्ये पूर्वी काम करणारी एक बारबालादेखील होती. तिच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी खंडेलवाल आला होता. मात्र, बारच्या प्रकरणात बाहेरच्यांचा हस्तक्षेप नको, असे स्वप्निल यांनी मनोजला सांगितले. त्यामुळे राग आलेल्या मनोज व त्याच्या सहकान्याने त्यांना मारहाण करून स्वतःकडे असलेले पिस्तुल रोखून ठार करण्याची धमकीदेखील दिली, याप्रकरणी स्वप्निल मोरे यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिस ठाण्यात मनोज खंडेलवाल व रितेश सिंह यांच्यावर हत्येचा प्रयत्न व आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

खंडेलवालची पोलिस अधिकाऱ्याच्या दालनात कशासाठी असते उठबस?

डोंबिवली येथे राहणाऱ्या मनोज खंडेलवाल याची एका पोलिस अधिकाऱ्याच्या दालनात नियमित तोडपाण्याची उठबस असायची. यामुळे बार, डान्सबार चालकांमध्ये त्याची 'मांडवलीवाला अशी ओळख आहे. शिवाय पोलिसांसोबत असलेल्या घनिष्ट संबंधातून अवैध धदेवाल्यांमध्येदेखील त्याचा दरारा आहे. याच कारणाने बारचालक व बारबाला यांच्यातील प्रकरणात मांडवली करण्यासाठी रविवारी रात्री तो मधुबन बारचालक स्वप्निल मोरेना भेटायला गेला होता. या घटनेवरून शहरातील बार, डान्सबार गुन्हेगारीला कारणीभूत ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून असे प्रकार पोलिस आयुक्तांची डोकेदुखी वाढवणारे ठरत आहेत.
 

Web Title: dance bar in navi mumbai police commissioner strong officers not serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.