महामार्गावर अपघातांचा धोका; पावसामुळे उड्डाणपुलावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:32 AM2019-07-01T05:32:02+5:302019-07-01T05:32:12+5:30
पहिल्याच पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर शिरवणे तसेच उरण फाटा येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
नवी मुंबई : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडत असल्याने तिथल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पहिल्याच पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर शिरवणे तसेच उरण फाटा येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे त्याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यापैकी काही खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. यानुसार शिरवणे पुलालगत भर पावसात खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र रविवारी दिसत होते. मात्र उरण फाटा येथील पुलावर देखील सीबीडीकडे जाणाऱ्या लेनवर खड्डे पडले आहेत. गतवर्षी देखील या पुलावर खड्डे पडले होते, तर शिरवणे येथील संपूर्ण पुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांपासून संपूर्ण ठाणे-बेलापूर मार्गाच्या दुरुस्ती कामांतर्गत सातत्याने खड्डे पडणाºया ठिकाणांचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतरही अवघ्या चार दिवसांच्या पावसामुळे या दुरुस्तीकामांच्या दर्जाचा भांडाफोड झाला आहे. या खड्ड्यांच्या ठिकाणी वाहनांची गती मंदावत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. तर रात्रीच्या वेळी हे खड्डे दुचाकीस्वारांच्या नजरेस न पडल्यास अपघात घडून जीवितहानी होवू शकते. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. गतवर्षी पावसाळ्यात अशाच खड्ड्यांमुळे घडलेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड देखील केली होती. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरवातीलाच सायन- पनवेल मार्गावर खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे अपघातांच्या घटनांमधून घडणारी मृत्यूची मालिका यंदाही सुरूच राहणार का ? असा संतात प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.