चिपळे, शांतिवन पुलाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:24 AM2019-07-29T02:24:31+5:302019-07-29T02:25:04+5:30
डांबर उखडले : खांब जीर्ण, लोखंड गंजल्याने नागरिकांच्या जिवास धोका
मयुर तांबडे
पनवेल : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचा पत्रा खाली लोंबकळत आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेला आहे. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू लागले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा परिषदेच्या शांतिवन पुलाच्या खालील बांधकामाचे लोखंड उघडे पडले असून ते गंजू लागले आहे. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. २००५ मध्ये झालेल्या महापुरामध्ये शांतिवन पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पुलाचे डागडुजी करण्यात आली होती. सध्या पुलाखालील सिमेंटचे काँक्रिटीकरण निखळत चालले असून, पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
शनिवारी पुलावरून पाणी वाहून गेले. यावेळी प्रवाहही वेगात असल्याने पुलावर काही ठिकाणी डांबर वाहून गेले. पुलावरून पाणी जाऊ लागल्याने वाहतूकही बंद करण्यात आली होती.धोकादायक बनलेल्या चिपळे पुलाच्या लोखंडी सळ्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तालुक्यात गाढी नदीवर १९७५ मध्ये पूल बांधण्यात आला आहे. पुलाचे आयुर्मान ५० वर्षे असून, पुलाला ४३ वर्षे होऊन गेलेली आहेत. मात्र, सद्यस्थितीत पूल जीर्ण झाला असून, लोखंडी सळ्या पाण्यात लटकू लागल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलाचे रेलिंगदेखील काही ठिकाणी तुटले आहे. शनिवारी, २७ जुलै रोजी पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी गेले असल्याने नागरिक भयभीत झाले होते.
चिपळे पुलाचे डागडुजीकरणाचे २३ लाखांचे काम अपूर्ण स्थितीत आहे. ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने लोखंडी सळ्या जैसे थे आहेत. पुलाची डागडुजी, रंगकाम, रेलिंग दुरुस्ती पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्यात आलेले नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.