रस्त्यावर पडलेल्या मास्कमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:02 AM2021-03-04T00:02:55+5:302021-03-04T00:03:01+5:30
पनवेलमधील स्थिती : संसर्ग वाढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : कोविड संक्रमणाचा प्रभाव वाढत आहे. त्याबाबत पनवेल परिसरातील नागरिक योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न वापरणे, त्याचबरोबर वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट न लावता रस्त्यावर फेकणे आदी गोष्टींमुळे परिसरात कोरोना संसर्गाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. याबाबत महापालिकेकडून उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
कोविड संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायझर व मास्कचा वापर प्रभावी ठरत आहे. त्यामुळे मेडिकल तसेच बाजारात सॅनिटायझर तसेच मास्कची मागणी वाढली आहे. पनवेल परिसरात दररोज पन्नासपेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत आहेत. मंगळवारपर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात ५३२ जणांना, तर ग्रामीण भागात १६२ जणांना कोरोना झाला आहे. दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी बीट मार्शलची नेमणूक करण्यात आली असली तरी कारवाई कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील गर्दी, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे तसेच शहरात नागरिकांकडून मास्क रस्त्यावर फेकले जात आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गात वाढ होण्यास भर पडत आहे. पर्यावरण तज्ज्ञाच्या मते मास्कचा समावेश बायोमेडिकल वेस्टमध्ये होतो. त्याची विल्हेवाट शास्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे; परंतु तसे नागरिकांकडून गांभीर्याने हाताळले जात नाही. शहरात कुठेही पडलेले मास्क, हातमोजे दृष्टीस पडत आहेत.
मी जबाबदार ….
नागरिकांना स्वत:ची काळजी स्त:च घ्यावी लागणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत कोरोनावर मात करता येऊ शकते . त्याकरिता नागरिकांकडून नियमाचे पालन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना करण्यात येत आहे. प्रत्येकवेळी प्रशासनावर जबाबदारी ढकलणे योग्य नाही. लोकांनीसुद्धा स्वत: जबाबदारी घेतली पाहिजे. इतरत्र मास्क फेकू नये , सोशल डिस्टन्सिंग , सॅनिटायझरचा वापर करण्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.