लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोलीसह शहरातील ११ धारण तलावांचे (होल्डिंग पाँड) अस्तित्व धोक्यात आले आहे. मँग्रोजमुळे तलावांची साफसफाई करता येत नाही. यामुळे भविष्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली किंवा मोठी भरती आल्यास खाडीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाची परवानगी मिळवून साफसफाईची कामे करण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केली आहे. नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसले आहे. समुद्राला भरती आली की खाडीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. भविष्यात शहराला पुराचा धोका पोहचू नये यासाठी सिडकोने बेलापूर ते ऐरोलीदरम्यान तब्बल ११ धारण तलाव तयार केले आहेत. २०० हेक्टर क्षेत्रफळावर हे तलाव तयार केले आहेत. परंतु मागील काही वर्षामध्ये या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावामध्ये खारफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऐरोलीमध्ये तब्बल ३० हेक्टर क्षेत्रफळावर दोन धारण तलाव आहेत. पण त्याची साफसफाई झाली नसल्यामुळे त्यामध्ये खारफुटी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी अशोक पाटील, नगरसेविका संगीता पाटील यांनी वारंवार होल्डिंग पाँडची सफाई करण्याची मागणी केली आहे. परंतु हा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने प्रशासनाकडून साफसफाई करता येत नाही. यामुळे तलावांचे अस्तित्वच धोक्यात येवू लागले आहे. शक्य तितक्या लवकर गाळ काढण्याचे काम सुरू केले नाही तर भविष्यात धारण तलावांचे अस्तित्व नष्ट होणार असून भविष्यात त्याचा गंभीर परिणाम शहराच्या सुरक्षेवर होणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने साफसफाई करणे किती आवश्यक आहे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे व हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ऐरोलीप्रमाणे इतर ठिकाणच्या होल्डिंग पाँडची स्थितीही बिकट झाली आहे. वाशी व कोपरखैरणेच्या मध्यभागी असलेल्या होल्डींग पाँडचीही दुरावस्था झाली आहे. शिक्षण मंडळाचे माजी सभापती राम विचारे यांनी वारंवार या होल्डिंग पाँडची साफसफाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. सिडकोने होल्डिंग पाँड बांधला तेव्हा त्यामध्ये खारफुटी नव्हती. भरतीच्या पाण्याबरोबर खारफुटीचे बी तलावामध्ये येवून वृक्ष वाढले आहेत. सॅटेलाइट चित्रांचा आधार घेतला तरी दहा वर्षांपूर्वी तलावामध्ये हे वृक्ष नसल्याचे स्पष्ट होईल असेही त्यांनी वेळोवेळी निदर्शनास आले आहे.
शहरातील धारण तलावांचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: May 11, 2017 2:20 AM