पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार
By नारायण जाधव | Published: May 2, 2024 08:00 PM2024-05-02T20:00:13+5:302024-05-02T20:00:57+5:30
पर्यावरणप्रेमी पुरोहित यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :नवी मुंबईच्या पाम बीच रस्त्यावरील टीएस चाणक्य, एनआरआय परिसरातील खारफुटी आणि वृक्षतोडीसह फ्लेमिंगोंचा मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच महापालिकेच्या ठेकेदाराने याच भागात पदपथाचे काम करताना झाडांना धोका पाेहचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या भागाती सनदी अधिकाऱ्यांच्या वनश्री सोसायटीनजीक हा प्रकार घडला असून येथील पर्यावरणप्रेमी पुरोहित यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
वनश्री सोसायटीच्या परिसरातील सद्यस्थितील पदपथाचे ब्लाॅक काढून तिथे नवे ब्लाॅक टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ते करताना संबधित ठेकेदाराने तिथे असलेल्या १५ ते २० वर्षे जुन्या वृक्षांची कोणतीही काळजी न घेता त्यांच्या आजूबाजूचे ब्लाॅक काढून तसेच दगडमाती झाडांभोवती टाकून त्यांना धोका पोहवण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे या कामावर देखरेख ठेवणारे महापालिकेच्या संबधित अभियंत्यानेही याकडे कानाडोळा करून ठेकेदारास पाठिशी घालण्याचे काम केले आहे. यामुळे ठेकेदार, संबधित अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित करून वृक्ष संवर्धन कायद्यानुसार कारवाई मागणी पुरोहित यांनी आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.