धोकादायक इमारतींची पडझड सुरूच; कळंबोलीत इमारतीचा भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:10 AM2019-08-09T01:10:46+5:302019-08-09T01:10:53+5:30
परिसरातील दुसरी घटना; सिडकोने बजावली होती नोटीस
कळंबोली : कळंबोलीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेल्या रिधिमा सोसायटीचा काही भाग बुधवारी व गुरुवारी कोसळला. यात जीवितहानी झाली नसली तरी बाजूला असलेल्या इमारतीस धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळू शकते. त्यामुळे महापालिकेने बाजूच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महिन्याभरात कळंबोली परिसरातील ही दुसरी घडना आहे. वारंवार तक्रार करूनही सिडकोने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
कळंबोली सिडको वसाहतीत करवली चौकाजवळच रिधिमा सोसायटी आहे. ही सहा मजली इमारत १९९० मध्ये बांधण्यात आली. सोसायटीत एकूण २२ सदनिका आहेत. २००७ मध्ये सिडकोने इमारत धोकादायक ठरवून पहिली नोटीस दिली होती. त्यानुसार दरवर्षी नोटीस येत असल्याने २०११ मध्ये सदनिकाधारक घरे खाली करून अन्यत्र राहण्यास गेले. तेव्हापासून इमारत बंदावस्थेत होती. त्यामुळे इमारतीची डागडुजी तसेच दुरुस्तीही करण्यात आली नाही. मोडकळीस आलेल्या इमारतीचा काही भाग बुधवारी पडल्यामुळे शिवसैनिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत महापालिकेकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर, प्रभाग अधिकारी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली. इमारतीचा पुढील भाग कोसळला आहे. उपायुक्त लेंगरेकर यांनी तत्परता दाखवत रिधिमा इमारतीच्या पाठीमागे राहत असलेल्या ई-१ टाइपमधील घरे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खाली केली. तर बाजूच्या सोसायटीलाही सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर इमारती समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
कळंबोलीत धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर
कळंबोली वसाहतीतील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत. याबाबत सिडको तसेच महापालिकेकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप तसाच असल्याने हजारो कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सिडको तसेच महापालिकेला आता तरी जाग येईल का? असा प्रश्न येथील रहिवासी आत्माराम गावंड यांनी उपस्थित केला आहे.
तुर्भेत कोसळले होते घर
नवी मुंबईमध्येही धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात इमारतींचा स्लॅब व घरे कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. ३ आॅगस्टला डोंगरभागातील जमीन खचल्याने घर कोसळल्याची घटना तुर्भेतील इंदिरानगर परिसरात घडली. या वेळी वेळीच घरातील व्यक्तींनी बाहेर पळ काढल्याने कोणाला दुखापत झाली नाही. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने नऊ घरे बंद केली असून एमआयडीसीत डोंगररांगांवर असलेल्या घरांना नोटीस दिली आहे.
वाशी सेक्टर चारमधील इमारत कोसळली
वाशी सेक्टर ४ मधील कामगार विमा योजनेमधील कर्मचाºयांसाठी वसाहत उभारण्यात आली आहे. याठिकाणी वापरात नसलेली इमारत २ आॅगस्टला कोसळली. या इमारतीमध्ये कोणीही वास्तव्यास नसल्यामुळे जीवीतहानी झाली नाही; परंतु या घटनेनंतर नवी मुंबई परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास आले असून अशाप्रकारच्या इमारतींचा वापर थांबविण्याच्या नोटीस महापालिकेने दिल्या आहेत.
पनवेल शहरातील लाइनआळी येथील धोकादायक ठरलेल्या त्रिमूर्ती इमारतीच्या एका घराचा महिन्याभरापूर्वी स्लॅब कोसळला होता. या वेळी पनवेल महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहोचून रहिवाशांना सुरक्षितपणे हलविले होते. त्यानंतर इमारतीचा विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. पनवेल शहरात धोकादायक इमारतींना वेळोवेळी नोटिसा देऊन काही नागरिक अद्यापही तेथे राहत आहेत. यामुळे तत्काळ अशी धोकादायक घरे खाली करावीत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी घरमालक व भाडेकरू अशा वादामुळे काही भाडेकरू अशी धोकादायक घरे खाली करण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.
रिधिमा सोसायटी सिडकोने धोकादायक ठरवल्यानंतर २०११ मध्ये सोसायटीतील रहिवाशांनी घरे सोडून मुंबई, नवी मुंबईत राहण्याकरिता गेले आहेत. आम्ही सोसायटीधारक पुनर्बांधणीकरिता सिडकोकडे आठ वर्षांपासून पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा करीत आहोत. त्याचबरोबर महापालिकेलाही याबाबत पत्र देण्यात आले आहे.
- कैलास सिंग, रहिवासी, रिधिमा सोसायटी