धोकादायक इमारतींमुळे शेकडो रहिवाशांचा जीव धोक्यात
By Admin | Published: February 8, 2017 04:31 AM2017-02-08T04:31:49+5:302017-02-08T04:31:49+5:30
शहरात मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींमध्ये अद्यापही रहिवासी वास्तव्य करत आहेत. यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला
नवी मुंबई : शहरात मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींमध्ये अद्यापही रहिवासी वास्तव्य करत आहेत. यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असतानाही पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पालिकेने वसाहतीअंतर्गतची कामे करून रहिवाशांना आधार देण्याची गरज लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे.
शहरातील सिडकोनिर्मित बहुतांश इमारती धोकादायक झाल्या आहेत. २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या या इमारती असून त्यांची वेळोवेळी डागडुजी न झाल्याने पडझड सुरू आहे. छताचे प्लास्टर कोसळून काही रहिवासी जखमी देखील झाले आहेत. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली परिसरात अशा इमारती आहेत. वाशी सेक्टर १४, १५ मधील अशाच मोडकळीस आलेल्या इमारतींची स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी पाहणी केली. त्याठिकाणी एम.जी. कॉम्प्लेक्स, दत्तगुरू नगर, ओमकार अपार्टमेंट, सिध्दिविनायक, नवप्रेरणा तसेच अष्टविनायक अपार्टमेंट ह्या सिडकोने उभारलेल्या इमारती आहेत. सद्यस्थितीला त्यामधील बहुतांश इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. परंतु इमारतींची पडझड सुरू असतानाही, त्यांच्या पुनर्बांधणीचा निर्णय अद्यापही प्रशासन घेवू शकलेले नाही. इमारतींच्या पिलरला तडे गेले असून छताचेही प्लास्टर कोसळत आहेत. यामुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. वसाहतींच्या आवारातील गैरसोयींमुळे रहिवाशांच्या समस्या वाढल्या आहेत.
पालिकेने वसाहतीअंतर्गतच्या कामांना पुन्हा सुरवात करण्याची गरज नगरसेवक प्रकाश मोरे यांनी व्यक्त केली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पालिका अथवा सिडकोने वेळीच निर्णय न घेतल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)