शहरात धोकादायक विद्युत पोलची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:47 PM2019-07-24T23:47:52+5:302019-07-24T23:48:00+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नवी मुंबई : नवी मुंबई शहर विकसित करताना सिडकोने बसविलेले विद्युत खांब नादुरु स्त झाले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी विद्युत खांब पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
नवी मुंबई शहराचा विकास करताना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सिडकोने रस्त्याच्या कडेला विद्युत खांब बसविले होते. त्यानंतर महापालिकेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली असून सिडकोने बसविलेले विद्युत खांब देखील जुने झाले आहेत त्यामुळे धोकादायक विद्युत खांब कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्यावर्षी शहरातल्या धोकादायक आणि जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याच्या प्रस्तावाला महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी मिळाली होती. यामध्ये कोपरखैरणे ते दिघा भागातील ९९९, पामबीच मार्गावरील ४३८, तसेच बेलापूर ते वाशी परिसरातील ७९८ खांब बदलण्यात येणार होते. सदर खांब बदलण्याच्या कामाला विलंब होत असल्याने धोकादायक विद्युत खांबांची पडझड सुरूच आहे. सीवूड रेल्वे स्थानकाच्या बाहेर पश्चिमेला रस्त्याच्या दुभाजकामधील जीर्ण झालेला विद्युत खांब अचानक कोसळला यावेळी सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही. धोकादायक विद्युत खांबाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.