मयूर तांबडे। लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराला वेग येत आहे. मात्र पक्षात झालेली बंडखोरी व निवडणुकीत अपक्षांनी भरलेले अर्ज शेकाप आघाडीसह भाजपाच्या उमेदवारांना धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आता अपक्षांनी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शंभरहून अधिक अपक्षांसह छोट्या पक्षांनी दाखल केलेल्या अर्जांमुळे मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना धोका निर्माण असल्याचे बोलले जात आहे.निवडणुका म्हटल्यावर अपक्षांची डोकेदुखी ही प्रत्येक पक्षाला मारक ठरते. अशीच परिस्थिती पनवेल पालिकेतही आहे. पहिलीच महापालिकेची निवडणूक असल्याने भाजपा, शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र यातील काहींनाच उमेदवारी देण्यात आल्याने १०० हून अधिक उमेदवारांनी नाराजीचा सूर आवळत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्षांसाठी ही डोकेदुखी ठरणार आहेत.साम, दाम, दंड, भेद या उक्तीचा वापर करून अपक्षांना थांबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे अपक्षांचा भाव वाढणार आहे. पनवेल महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी आघाडी व युती करण्यात धन्यता मानली. शेकापने राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आघाडी केली तर भाजपाने आरपीआयसोबत युती करत शिवसेनेला देखील युतीत समाविष्ट करण्यास हात पुढे केला. मात्र शिवसेनेने स्वाभिमानी संघटनेसोबत घरोबा करत भाजपाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत टाळीच दिली नाही. त्यामुळे अखेरच्या दिवशी साऱ्याच पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी केली होती. यात अपक्षांची संख्या देखील लक्षणीय होती.अपक्षांनी २० प्रभागातील अनेक जागांवर उमेदवार उभे करून आव्हान निर्माण केले आहे. प्रभाग १८ ड मधून केवळ महाडिक तर प्रभाग १९ ड मधून राकेश जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग ९जमीर शेख,तर राष्ट्रवादीचे आनंद भंडारी, प्रभाग १६ मधून अपक्ष लढत आहेत. जयसिंग शेरे, विजय गुप्ता व डी.डी. गायकवाड यांनी देखील अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचे प्रभाग १५ अ मधून किशोर देवधेकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. शेकाप आघाडी व भाजपा या पक्षांना युती-आघाडीतून नाराजांचा मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याचे अपक्षांच्या संख्येवरून दिसून येत आहे. त्यात नवे चेहरे देताना जुन्या मातब्बरांना निवडणुकीपासून दूर ठेवल्याने त्या मातब्बरांची नाराजी आहेच. आघाडी-युतीत आयात करण्यात आलेल्या उमेदवारांवर डावलेल्या उमेदवारांचा नाराजीचा सूर राहणार आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ज्या प्रभागात आघाडी किंवा युतीच्या उमेदवारांना अपक्षांकडून धोका निर्माण झाला आहे, असे उमेदवार अर्ज माघारीच्या दिवशी ‘आॅऊट आॅफ रेंज’ असणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार आघाडी व युतीसाठी मारक ठरतील अशी चर्चा सुरू आहे, परंतु अपक्षांचीही मोठी फौज रिंगणात असल्याने त्यांचेही आव्हान प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांपुढे आहे. त्यातच संभाजी ब्रिगेड, रासप, प्रहार जनशक्ती पक्ष, विकास आघाडी, यासारखे छोटे पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या छोट्या पक्षांसह अपक्षांचा धोका हा युती व आघाडी दोन्ही बाजूच्या उमेदवारांना आहे. यामुळे पनवेलपालिकेवर सत्ता आणण्यासाठी युती व आघाडीतर्फे चुरस सुरू आहे.
अपक्षांमुळे बड्या पक्षांच्या उमेदवारांना धोका
By admin | Published: May 11, 2017 2:17 AM