शहरातील गटारांची कामे अपूर्णच, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:03 AM2019-05-30T00:03:44+5:302019-05-30T00:03:53+5:30
नवी मुंबई शहरात मान्सूनपूर्व कामे जलद गतीने सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मान्सूनपूर्व कामे जलद गतीने सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. परंतु अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना देखील गटारांच्या दुरु स्तीसाठी खोदकामे सुरू असून कामे अपूर्ण आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे आव्हान असून घाईगडबडीत होणाऱ्या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने गटारे सफाई तसेच नालेसफाई, वृक्ष छाटणी आदी मान्सूनपूर्व कामे केली जातात. तसेच शहरातील इतर सर्व प्राधिकरणांच्या परस्पर संपर्कात राहून मान्सूनपूर्व कामाचे पूर्वनियोजन केले जाते. यावर्षी शहरात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी घेऊन १६ मे रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेमार्फत करण्यात येणारी पावसाळापूर्व गटारे सफाई तसेच नालेसफाईची कामे २५ मेपर्यंत पूर्ण करावीत तसेच निविदा प्रक्रि येला काहीसा उशीर झालेली नालेसफाईची सहा कामे ३0 मेपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश दिले होते. त्यासोबतच पालिका क्षेत्रातील इतर प्राधिकरणांनी २५ मेपर्यंत पावसाळी कालावधीतील त्यांच्याशी संबंधित आवश्यक कामे पूर्ण करावीत असे सूचित केले होते. विविध प्राधिकरणांना त्यांच्या केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी देण्यात येणारी रस्त्यावरील खोदकामांची परवानगी पूर्णत: बंद करून ३0 मेपर्यंत रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची कामे पूर्ण करावीत असे निर्देशित केले होते. परंतु पावसाळा येऊन ठेपला तरी शहरातील विविध भागात गटारांच्या दुरु स्तीसाठी खोदकामे केली असून कामे अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. वाशी सेक्टर ३ आणि ४ भागातील गटारे दुरुस्तीच्या कामासाठी खोदून ठेवली असून पावसाळा सुरू होणार असल्याने कामे पूर्ण करण्यासाठी घाई होणार आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.