नवी मुंबई : केरळ राज्याची संस्कृती, इतिहास आणि परंपरेची माहिती होण्यासाठी बेलापूर येथील अर्बन हाटमध्ये केरळ महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. केरळ राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, केरळ सरकारच्या वतीने राबविलेल्या यशस्वी योजना तसेच कामगार, कलावंत आणि लघुउद्योजक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्र म राबविल्याची माहिती केरळचे कामगार मंत्री टी. पी रामकृष्णन यांनी दिली.गेल्या वर्षी महोत्सवाला मुंबईकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा २९ जानेवारीपर्यंत महोत्सव सुरु आहे. मल्याळी लोकांची लोकसंख्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून नवी मुंबई हे नियोजित शहर आहे. नवी मुंबईतील पर्यावरणपूरक अर्बन हाटसारखे अर्बन हाट केरळ मध्येही बनवले जाणार असल्याची माहिती जनसंपर्क विभागाचे प्रमुख डॉ. के. अम्पाडी यांनी दिली. महोत्सवात शहरातील कलाकारांना नृत्याविष्कार, नाट्य, संगीत सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पारंपरिक वस्तूच्या प्रदर्शनाशिवाय महोत्सवात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्र माची रेलचेल असणार आहे. केरळी मसाले, हस्तकलेच्या वस्तू, हातमागावर विणलेले कपडे, खाद्यपदार्थ, बांबू व नारळाच्या शेंड्यापासून बनविलेल्या पारंपरिक वस्तू महोत्सवात उपलब्ध आहेत. वर्षभर अर्बनहाटमध्ये विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे महोत्सव आयोजित करण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो.
नवी मुंबईकरांना घडवणार केरळच्या संस्कृतीचे दर्शन
By admin | Published: January 24, 2017 6:00 AM