कर्जत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:17 AM2017-10-17T07:17:27+5:302017-10-17T15:53:24+5:30
कर्जत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ठेकेदार दत्तात्रेय सुपे शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्याने विद्यार्थ्यांना ते घशाखालीही उतरविणे कठीण जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ठेकेदार दत्तात्रेय सुपे शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्याने विद्यार्थ्यांना ते घशाखालीही उतरविणे कठीण जात होते. अखेर जगणे असह्य झालेल्या विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठविताच प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांनी ठेकेदार सुपे याच्यावर कारवाई करत त्याला काळ्या यादीत टाकून त्याचे बिलही रोखले आहे. बचत गटाकडे या विद्यार्थ्यांना जेवण पुरविण्याचा ठेका दिला आहे.
या समस्येव्यतिरिक्त येथील विद्यार्थ्यांना अन्यही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वसतिगृहाच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने या विद्यार्थ्यांना तेथे राहणेही कठीण होत आहे. गळके छत, ओल्या भिंती, दमट कुबट वातावरण, बंद विद्युत उपकरणे, शौचालयाची पडझड, गढूळ पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्या येथे विद्यार्थ्यांना भेडसावत असून गृहपाल याकडे लक्ष देत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना नरकयातना भोगाव्या लागत
आहेत.
कर्जत शहरातील मुद्रे येथे एकात्मिक आदिवासी विकास पेण प्रकल्पाचे शासकीय आदिवासी वसतिगृह आहे. सध्या येथे पस्तीस विद्यार्थी आहेत. एक गृहपाल, एक सुरक्षा रक्षक, एक सफाई कामगार असे तीन कर्मचारी आहेत.
गृहपाल डी.बी. सूर्यवंशी आहेत. त्यांनी या वसतिगृहातच निवास करणे बंधनकारक आहे, परंतु तेही या वसतिगृहात फारच कमी वेळ उपस्थित राहत असून अन्य ठिकाणी निवास करतात. याबाबत विचारणा केली असता येथे योग्य निवासस्थान नसल्याने अन्यत्र राहत असल्याचे सांगण्यात आले.
या शासकीय आदिवासी वसतिगृहाला स्वत:ची हक्काची इमारत नसल्याने शहरातील मुद्रे येथील एका जीर्ण इमारतीत वसतिगृह चालविले जात आहे. भाडेतत्त्वावर असल्याने या इमारतीची डागडुजी करणे शक्य होत नाही असे संबंधित अधिकाºयाचे म्हणणे आहे. यामुळे याबाबत अधिकारी ही हतबल असल्याचे स्पष्ट होते.
या शासकीय आदिवासी वसतिगृहाला स्वत:ची हक्काची इमारत नसल्याने शहरातील मुद्रे येथील एका जीर्ण इमारतीत वसतिगृह चालविले जात आहे. भाडेतत्त्वावर असल्याने इमारतीची डागडुजी करणे शक्य होत नाही.