नवी मुंबई : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या निनादात नवी मुंबईतील दत्त मंदिरांमध्ये मंगळवारी दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिरांमध्ये भजन, कीर्तन व होम हवन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दर्शनासाठी मंदिरांचा परिसर भाविकांनी फुलला होता.
सानपाडा येथील दत्त मंदिरात मौजे सानपाडा देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोज़न करण्यात आले होते. २२ डिसेंबरपासून काकड आरती, हरिपाठ व आरती, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २६ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने सुवर्ण पादुकांवर अभिषेक, गुरुचरित्र पारायण समाप्ती, हरिपाठ, दिवसभर विविध महिला व पुरुष भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम, ह.भ.प. एकनाथ महाराज सागोळकर यांचे श्री दत्त जन्माचे कीर्तन, श्री. दत्त जन्माचे पाळणागीत, मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा व गावदेवी मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोज़न करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाविक दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी झाली होती. शिरवणे गाव येथे श्री दत्त महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजिला होता. यावेळी श्री. दत्त महाराज अभिषेक, पद्यपूजा व आरती, श्रीदत्त जन्माचे कीर्तन, हरिपाठ, भजन, पाळणा व आरती, दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या मागदर्शनानुसार सेक्टर २० नेरूळगाव येथे देखील श्रीदत्त जयंती साजरा करण्यात आली. यावेळी हरिपाठ, पूजा, आरती, भजन आदी कार्यक्रमासह तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजण करण्यात आले होते. या ठिकाणी देखील दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
नेरूळमध्येही कार्यक्रम
नेरूळ सेक्टर १५ मधील इच्छापूर्ती श्रीदत्त दिगंबर स्वामी मंदिरात श्रीदत्त जन्म व दत्तजयंती उत्सव ओम श्री सद्गुरू सीताराम शांतिस्थान संस्थेच्या वतीने २५ आणि २६ डिसेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या उत्सवात सोमवारी श्रींचा नित्याभिषेक, श्री सद्गुरू पादुका पूजन, हरिपाठ, श्रीदत्त जन्माचे प्रवचन, मंगळवारी पहाटे श्रींची महापूजा, सहस्र तुलसिदल अभिषेक व आरती, महागायत्री यज्ञ, दुपारी महाप्रसाद, नामयज्ञ, हरिपाठ, सायंकाळी सत्संग, महाआरती सोहळा, मान्यवरांचे स्वागत रात्री दर्शन सोहळा आणि महाप्रसाद आणि भक्तिरंग या भक्तिगीते आणि नृत्य कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी समितीमध्ये श्रीसद्गुरू दिगंबर सरस्वती स्वामी, अध्यक्ष आर.सी.पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र ढोले, सचिव सुदाम बटवाल, विश्वस्त नीलेश वाव्हळ, श्रीराम सावंत, मोहन सूर्यवंशी आदी आहेत.