वाशी गावात डे नाईट क्रिकेट स्पर्धा, पतंग महोत्सवाला सुरुवात
By admin | Published: January 14, 2017 07:06 AM2017-01-14T07:06:47+5:302017-01-14T07:06:47+5:30
लोकमत माध्यम प्रायोजक आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आणि पतंग
नवी मुंबई : लोकमत माध्यम प्रायोजक आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आणि पतंग महोत्सवाचा गुरुवारी शुभारंभ झाला. वाशी गावातील शिवतीर्थ मैदानात करसन भगत स्मृती चषक २०१७ सुरुवात झाली आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात संध्याकाळी ६ ते रात्री १० यावेळेत क्रिकेटचे सामने होणार आहेत.
नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत आणि ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशात रंगीबेरंगी फुगे उडवून याठिकाणी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार माणिकराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. याठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पुरस्कारांचा समावेश आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत, लोकमत मुंबई विभागाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.