नवी मुंबई - तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांनी कुख्यात गुंड विकी देशमुखच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली आहे. तर हत्येनंतर मृतदेह कोणाच्या हाती लागू नये यासाठी त्यांनी मृतदेहाची तीनदा विल्हेवाट लावल्याची कबुली त्यांनी दिली आहे. नेरुळ येथे राहणारा सचिन गर्जे (32) हा 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा कुटुंबीयांनी काही तरुणांवर संशय व्यक्त केला होता.सचिन हा एका गुन्ह्यात यापूर्वी जेलमध्ये होता. यावेळी कुख्यात गुंड विकी देशमुख याच्यासोबत त्याची ओळख झाली होती. त्यामुळे सचिन याच्या बेपत्ता होण्यामागे देशमुख याचा हात असल्याचा पोलिसांचा संशय होता. यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, निलेश तांबे, राजेश गज्जल, सहायक उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार सतीश सरफरे, पोपट पावरा, प्रकाश साळुंखे, विजय पाटील आदींचा समावेश होता. त्यांनी सचिन बेपत्ता झाल्याच्या दिवशी तो कोणाच्या संपर्कात होता याची माहिती घेतली. त्यामध्ये समोर आलेल्या माहितीवरून विक्रांत कोळी (22), नारायण पवळे (27) व रुपेश झिराळे (37) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.तसेच कुख्यात गुंड विकी देशमुख याच्या सांगण्यावरून सचिनचे अपहरण करून हत्या केल्याचीही कबुली दिली. तर हत्येनंतर मृतदेह कोणाच्या हाती लागू नये यासाठी तीनदा विल्हेवाट लावल्याचीही धक्कादायक कबुली त्यांनी दिली. भेटीचे कारण सांगून त्यांनी सचिनला सीवूड येथे बोलवून घेतले. यांनतर त्याचे अपहरण करून हत्या केल्यांनतर मृतदेह खाडीमध्ये फेकून दिला. त्या जागेवर त्यांच्याकडून लक्ष ठेवले जात असताना काही दिवसांनी मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी सदर मृतदेह पाण्याबाहेर काढून तो जमिनीत गाढला. त्यातूनही त्यांचं समाधान न झाल्याने काही दिवसांनी तो मृतदेह पुन्हा जमिनीबाहेर काढून कर्नाळा येथे डोंगर भागात नेला. त्याठिकाणी मृतदेह जाळून टाकण्यात आला. याप्रकरणी विकी देशमुख टोळीच्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र त्याची हत्या करण्यामागचे नेमकं कारण आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस विकी देशमुख याचा शोध घेत आहेत.
हत्येनंतर तीनदा मृतदेहाची लावली विल्हेवाट, विकी देशमुखच्या टोळीचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 9:48 PM