इमारतीच्या टेरेसवरचा स्टंट बेतला जिवावर, दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 11:20 PM2019-04-05T23:20:03+5:302019-04-05T23:20:18+5:30
एका इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न मुलाच्या जीवावर बेतला आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - एका इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न मुलाच्या जीवावर बेतला आहे. कार्तिश नाडणकर (15) असे मृत मुलाचे नाव आहे. तो जुईनगर सेक्टर 24 येथील अजिंक्यतारा या चार मजली इमारतीमध्ये राहणारा आहे. कार्तिश याने यंदा दहावीची परीक्षा दिलेली आहे.
शुक्रवारी रात्री त्याचा इमारतीच्या छतावरून खाली कोसळून मृत्यू झाला. यावेळी तो काही मुलांसमोर एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारण्याचा स्टंट करत होता, असे समजते. दरम्यान त्याने उडी मारल्यानंतर छताचा पत्रा तुटल्याने तो खाली कोसळला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेच्या काही वेळ अगोदर त्याने इमारतीखाली खेळणाऱ्या मुलांकडे क्रिकेटबद्दल विचारले होते. मात्र नुकतेच क्रिकेट बंद केल्याचे मित्रांनी सांगितल्यानंतर तो इमारतीच्या छतावर गेला होता. यामुळे त्याने स्टंट करण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
विदेशात चालणारे अश्या जीवघेण्या स्टंट चे लोन सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुंबईत देखील पसरत चालले आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत अशा प्रकारचे स्टंट करून त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. मात्र कोणतेही प्रशिक्षण नसताना मुलांकडून केले जाणारे असे स्टंट जीवघेणे ठरत आहेत. दरम्यान जुईनगर येथिल या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.