फ्लेमिंगो अभयारण्यात मच्छिमारांना सापडला मृत सोनेरी कोल्हा
By नारायण जाधव | Published: May 29, 2023 06:44 PM2023-05-29T18:44:32+5:302023-05-29T18:45:09+5:30
भांडुप पम्पिंग स्टेशनच्या हद्दीत हा मृत कोल्हा दिसला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: जागतिक रामसर क्षेत्राचा दर्जा मिळालेल्या ठाणे खाडीच्या फ्लेमिंगो अभयारण्यात स्थानिक मच्छिमारांना सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळला आहे.
भांडुप पम्पिंग स्टेशनच्या हद्दीत रविवारी सकाळी हा मृत कोल्हा दिसला. याची माहिती मच्छिमारांनी पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाला दिली. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी ऐरोलीतील फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यातील केंद्रात कोल्ह्याचा मृतदेह पाठविला असून, शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण समोर येणार आहे. मात्र, मृत कोल्ह्याच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे वयोमानानुसार त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
ठाणे खाडी परिसरात अनेकदा सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले आहे. ऐरोली, घणसोली, पाच बीच मार्ग, उरण परिसरात अनेकदा मच्छिमार, शेतकरी, पर्यावरणप्रेमी यांना तो नजरेस पडला आहे. ठाणे खाडीच्या परिसरात अनेक विविध पक्षी, प्राणी नजरेस पडतात. राज्य शासनाने ठाणे खाडीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा दिला असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या पाठपुराव्यानंतर ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
नवी मुंबई शहराच्या परिसरात फ्लेमिंगोंचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यामुळे शहराला फ्लेमिंगो सिटी ही थीम लक्षात घेत महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सजविले आहे.