मृत बिबट्याचे मांस केले फस्त, पनवेलच्या मोर्बी धरणालगतच्या जंगलातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 05:23 PM2020-12-16T17:23:13+5:302020-12-16T17:24:27+5:30
Navi Mumbai News : सर्वजण पालेखुर्द गावचे राहणारे आहेत. दिड महिन्यापूर्वी त्यांना जंगलात मृत बिबट्या आढळला होता.
नवी मुंबई : मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचे कातडे व नखे काढून मांस फस्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पनवेल मधील मोर्बी धरण लगतच्या जंगलात हा प्रकार घडला आहे. त्यांचे इतर दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे पोलीस नाईक सचिन टाके यांना पनवेल मधील एका व्यक्तीकडे वाघनखे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर व सहायक निरीक्षक निलेश तांबे यांच्या पथकाने मोर्बी धरणालगतच्या जंगलातून दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांच्या पालेखुर्द येथील घरातून चार नखे व प्राण्याची कातडी आढळून आली. याबाबत वन विभागाला कळवले असता ती नखे व कातडी बिबट्याची असल्याचे उघड झाले. त्यानुसार गणपत पालकू लोभी (२६) व गणपत राघू वाघ (५५) यांना अटक करून त्यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे इतर दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सर्वजण पालेखुर्द गावचे राहणारे आहेत. दिड महिन्यापूर्वी त्यांना जंगलात मृत बिबट्या आढळला होता.
त्याला जंगलातील झोपडीत नेवून जबडा वेगळा करून कातडी व नखे काढण्यात आली. यानंतर त्यांनी जंगलातच झोपडीत बिबट्याचे मांस शिजवून खाल्ल्याचे तपासात समोर आल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील आदी उपस्थित होते. मृत बिबट्याचे मांस फस्त केल्यानंतर त्याची चार नखे व कातडी दोघांकडे ठेवली होती. तर जबडा व इतर नखे फरार असलेल्या दोघांकडे आहेत. बिबट्याचे कातडे, नखे तसेच जबडा विकण्याच्या प्रयत्न होता. परंतु मांस ताजे असल्याने त्यापासून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्यांनी ते स्वतःकडेच ठेवले होते. त्यांनी धरणालगत सापळा रचून या बिबट्याची हत्या केली असावी अशीही शक्यता पोलीस वर्तवत आहेत.