मुलाच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:16 AM2018-06-11T04:16:06+5:302018-06-11T04:16:06+5:30
लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई - लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिफ्ट बसवण्याची जागा उघडी असल्याने अपघाताची शक्यता असतानाही रहिवाशांनी सांगून देखील दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे.
दिघा येथील ओंकारेश्वर प्लाझा इमारतीमध्ये शुक्रवारी ही दुर्घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारा चेतन खराडे (१४) हा घरासमोरील मोकळ्या जागेत उभा होता. त्याठिकाणी त्याचे काही मित्र कॅरम खेळत होते. यावेळी चेतनचा तोल जाऊन तो लिफ्ट बसवण्यासाठी बनवलेल्या मोकळ्या जागेतून खाली कोसळला. मात्र त्याला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी चेतन याचे वडील परशुराम खराडे यांनी इमारत व जागेचे मालक जगदीश खांडेकरविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
ओंकारेश्वर इमारतीमधील रहिवाशांनी लिफ्टसाठी मोकळी सोडलेली जागा धोकादायक असल्याची तक्रार अनेकदा खांडेकर याच्याकडे केलेली. मात्र त्यांनी दुर्लक्ष करून लिफ्ट बसवण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या सात मजली इमारतीमधील सुमारे २८ घरांमधील रहिवासी घराबाहेर निघताना जीव मुठीत धरून निघायचे. अखेर शुक्रवारी चेतन याचा त्याच जागेतून पडून मृत्यूची घटना घडली. यामुळे सदर दुर्घटनेला इमारत मालक कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.