अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By admin | Published: January 9, 2016 02:24 AM2016-01-09T02:24:09+5:302016-01-09T02:24:09+5:30
एनएच-४ बी, एमएच- ५४ या महामार्गावरील अपघाताचे लोण आता उरण पूर्व भागात येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी भरधाव कंटेनर ट्रेलरने चिरनेर येथील
उरण : एनएच-४ बी, एमएच- ५४ या महामार्गावरील अपघाताचे लोण आता उरण पूर्व भागात येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी भरधाव कंटेनर ट्रेलरने चिरनेर येथील एका तरुणाला चिरडले. अपघातात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला.
जितेंद्र भरत काळण (१८) असे या तरुणाचे नाव असून, तो स्कुटीवरून कामाला निघाला असताना विंधणे येथे ट्रेलरने त्याला धडक दिली. त्यात कंटेनर ट्रेलरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
अपघातानंतर चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
जितेंद्र काळण हा नुकताच एका खासगी बँकेमध्ये नोकरीला लागला होता. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो कामाला निघाला असतानाच गव्हाणफाट्याकडून चिरनेरकडे येणारा ट्रेलर (आरजे-०९जीए-८१११) या ट्रकने त्याच्या स्कुटीला धडक दिली. या धडकेत जितेंद्र स्कूटरसह खाली पडला, त्या वेळेस ट्रेलरचे पाठीमागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरची वाहतूक रोखून धरली होती. अखेर आमदार मनोहर भोईर यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढून यापुढे या मार्गावरील अवजड वाहतूक बंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. ग्रामस्थांचा संताप पाहून एसीपी शेषराव सूर्यवंशी, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)