नेरळ : कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या बोरगाव येथे वणव्यात होरपळून एका वृध्दाचा (७०) मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. मारु ती जानू पाटील असे या वृध्द व्यक्तीचे नाव असून या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उप विभागीय अधिकारी शालीग्राम पाटील, मंडल अधिकारी आर. जी. भालेराव, वनपाल वाय. एस. महाजन, नेरळचे सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीतील बोरगाव गावाबाहेरील असणाऱ्या जंगलात सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता. त्यावेळी मारु ती पाटील यांची शेती त्याच भागात असल्याने ते आपल्या शेतातही वणवा लागला आहे का हे पाहण्यासाठी गेले होते. शेत वणव्यात जळताना पाहिल्यावर ते विझवण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु प्रचंड उन्हाने वणवा आणखी भडकल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही पाटील घरी आले नाहीत म्हणून घरातील व गावातील माणसे त्यांना शोधण्यास गेली असताना मारु ती पाटील यांचा गावाबाहेरील धबधबा माळावर लागलेल्या वणव्यात होरपळून मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तत्काळ पोलीस, वनविभागाचे अधिकारी, महसूल अधिकारी यांनी त्वरित भेट देऊन पंचनामा केला असल्याचे मंडळ अधिकारी आर.जी. भालेराव यांच्याकडून सांगण्यात आले.
वणव्यात होरपळून वृद्धाचा मृत्यू
By admin | Published: March 23, 2016 2:20 AM