वेळेत उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू; नेरुळमधील रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:40 PM2020-08-26T23:40:46+5:302020-08-26T23:41:41+5:30
खारघर येथे राहणारे ६२ वर्षीय साधू कदम यांना १५ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना खारघरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
नवी मुंबई : खारघरमधील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असताना, नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात आवश्यक सुविधा मिळण्यास विलंब झाल्याने रुग्ण दगावला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे, रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
खारघर येथे राहणारे ६२ वर्षीय साधू कदम यांना १५ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना खारघरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. कदम यांची कोरोना तपासणी केली असता, पॉझिटिव्ह अहवाल आला होता. खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यावर नातेवाईकांनी उपचारासाठी नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची विनंती पनवेल महापालिकेकडे केली होती. त्यानुसार, शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी बेड उपलब्ध करून देण्यात आल्याने, कदम यांना डी.वाय.पाटील रुग्णालयात हलवले होते, परंतु रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने उपचार करण्यास विलंब झाला आणि कदम यांचे निधन झाल्याचा आरोप कदम यांचे जावई अतुल सपकाळ यांनी केला आहे.
शनिवारी रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नव्हता, परंतु पनवेल महापालिकेचे नोडल ऑफिसर मनोजकुमार शेट्टे यांनी रुग्णालयात एक बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, आयसीयूमध्ये एक बेड उपलब्ध करून दिला होता. रुग्णाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाठविण्यास सांगितले होते, परंतु रुग्ण वेळेवर न आल्याने साडेसात वाजता अचानक आलेल्या दुसऱ्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने त्यांना तो बेड देण्यात आला. सदर रुग्ण साडेनऊ वाजता रुग्णालयात आला. त्यानंतरही आम्ही तत्काळ उपचार सुरू केले होते. एक तासात या रुग्णाला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर बेडही उपलब्ध करून दिला होता, परंतु दुर्दैवाने पहाटे त्यांचे निधन झाले. - राहुल पेड्डावाड, सीईओ डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय, नेरुळ