वावोशी : तालुक्यातील डोलवली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील अकरावर्षीय यमुना खडके (रा. चांगेवाडी, कर्जत) या मुलींचा किरकोळ आजारात झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र आश्रमशाळेतील हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी यमुना वासुदेव खडके या मुलीला ९ जानेवारीला कफ होवून ऊलटी झाल्यामुळे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करता आणले होते. डॉक्टरांनी यमुनाची तपासणी करून तिला तीन दिवसांचा औषधापचार घेण्यास सांगितले होते. त्यानंतर गुरूवारी (१२ जानेवारी) दुपारी यमुनाला पुन्हा उलटी झाली. आश्रमशाळेतील अधिक्षक कांबळे पुन्हा संध्याकाळी यमुनाला घेवून प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर येथे आल्या. कफ जास्त असून एक्सरे काढावा लागेल असा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौरे यांनी देवून औषधोपचार केले होते. त्यानंतर यमुना व कांबळे वसतिगृहावर परतले होते. त्याच रात्री साडे अकरा वाजता यमुनाला पुन्हा ऊलटी झाली. शुक्र वारी पहाटे साडेपाचला शिक्षिका हसु सुतक यमुनाला उठविण्यासाठी गेल्या असता तिची काही हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे शिक्षिका हसु सुतक यांनी आश्रमशाळेतील स्टाफ बोलावून यमुनाला तातडीची खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर काही तासापूर्वीच यमुनाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (वार्ताहर)
डोलवली आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: January 14, 2017 6:58 AM