स्वप्निल सोनावणे हत्येतील मुख्य आरोपीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 02:47 AM2017-12-24T02:47:47+5:302017-12-24T02:47:59+5:30
राज्यभर गाजलेल्या स्वप्निल सोनावणे हत्येमधील मुख्य आरोपी राजेंद्र नाईक याचा शुक्रवारी तळोजा तुरूंगात आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. करावेगावातील स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवी मुंबई : राज्यभर गाजलेल्या स्वप्निल सोनावणे हत्येमधील मुख्य आरोपी राजेंद्र नाईक याचा शुक्रवारी तळोजा तुरूंगात आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. करावेगावातील स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेरुळमधील एसबीआय कॉलनीमध्ये राहणाºया स्वप्निल सोनावणेला आरोपी राजेंद्र नाईक व त्याच्या मुलांनी बेदम मारहाण केली होती. प्रेमप्रकरणाच्या संशयातून झालेल्या मारहाणीमध्ये १९ जुलै २०१६ रोजी स्वप्निलचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण होण्याच्या एक दिवस अगोदरच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती; परंतु पोलिसांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे त्याला मारहाण झाली व त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र नाईकसह एकूण १३ जणांना अटक झाली होती. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पाच जणांना जामीन मिळाला असून, उर्वरित आठ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात या प्रकरणी स्वप्निलचे वडील शहाजी सोनावणे यांनी या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडेही तक्रार केली आहे.