घणसोलीच्या प्रवेशद्वारावर मृत्यूचा सापळा; अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:52 PM2019-10-27T23:52:25+5:302019-10-27T23:52:36+5:30

ज्वलनशील द्रव्याचा साठा असलेल्या वाहनांचे पार्किंग

Death trap at the entrance to Ghanoli; Risk of accident | घणसोलीच्या प्रवेशद्वारावर मृत्यूचा सापळा; अपघाताचा धोका

घणसोलीच्या प्रवेशद्वारावर मृत्यूचा सापळा; अपघाताचा धोका

Next

नवी मुंबई : घणसोलीच्या प्रवेशमार्गावरील रस्त्याचा एक भाग पूर्णपणे अवैध पार्किंगसाठी बळकावण्यात आला आहे. बेकायदेशीररीत्या त्या ठिकाणी पार्किंग सुरू करून त्याची रक्कम उकळली जात असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्या ठिकाणी उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या टँकरचाही समावेश असल्याने घणसोलीच्या प्रवेशद्वारावरच मृत्यूचा सापळा तयार झाला आहे.

घणसोली सेक्टर ६ येथून घणसोलीत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे अवैध वाहनतळ म्हणून वापरली जात आहे. त्या ठिकाणी ज्वलनशील वायूसह इतर घातक द्रव्याचे टँकर उभे केले जात आहेत. त्यावर काम करणारे कामगारही परिसरातच उघड्यावर लघुशंका करत असल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडत आहे. याचा नाहक त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. तर अवैधरीत्या चालत असलेल्या पार्किंगसाठी पूर्ण रस्ता बळकावण्यात आल्याने इतर वाहनांच्या मार्गात त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. अशा वेळी एखाद्या भरधाव वाहनाची धडक तिथल्या उभ्या असलेल्या वाहनाला लागल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी रस्त्यावर अवैधरीत्या वाहने उभी करण्याचे काही व्यक्तींकडून शुल्कही उकळले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याकरिता काही कथित सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्तींचेही त्यांना पाठबळ मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या अर्थपूर्ण हितसंबंधामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांसह पालिका अधिकारीही दिवसातून अनेकदा या रस्त्याचा वापर करतात. मात्र, त्यांच्याकडूनही रस्त्यावरील अवैधरीत्या उभी केलेली वाहने हटवण्याचे धाडस दाखवले जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे; परंतु त्यांच्या दुर्लक्षामुळे घणसोलीत प्रवेशाच्या मार्गावर मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन एखाद्या समाजकंटकाकडून गैरकृत्य घडल्यास तिथली वाहने पेट घेऊ शकतात. अशा वेळी त्यामधील वायू अथवा द्रव्याची गळती झाल्यास संपूर्ण परिसराला धोका उद्भवू शकतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य प्रशासनाकडून घेतले जात नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Death trap at the entrance to Ghanoli; Risk of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.