नवी मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकातील चार क्रमांकाच्या फलाटावर रेल्वेप्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. त्या ठिकाणच्या भूमिगत केबल वाहिन्यांच्या चेंबरचे झाकण उघडेच असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी एखादा प्रवासी त्यात पडल्यास त्याला प्राणास मुकावे लागू शकते.शहरातील सर्वच रेल्वेस्थानके समस्यांनी ग्रासलेली असतानाच, फलाटांवरही प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. मात्र, प्रशासनाची उदासीनता प्रवाशांच्या जीवावर बेतेल, असा प्रकार सानपाडा स्थानकात पाहावयास मिळत आहे. फलाट क्रमांक चारवरील केबल चेंबरचे झाकण तुटलेले आहे. त्या ठिकाणी नवे झाकण बसवण्याची तातडीची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी त्या ठिकाणी मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. सानपाडा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणाऱ्या मार्गाच्या फलाटावर हा प्रकार पाहावयास मिळत आहे. फलाटाच्या सुरुवातीलाच हे उघडे चेंबर असल्याने धावत लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी त्यात पडून जखमी होऊ शकतो. अथवा घाईमध्ये रेल्वेतून उतरणाºया प्रवाशालाही हा खड्डा मृत्यूच्या दाढेत खेचू शकतो; परंतु प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी संबंधित प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, भविष्यात त्या ठिकाणी अशी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा आरोप रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.
रेल्वेस्थानक फलाटावर मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:22 AM