नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २०मध्ये चालकाचा ताबा सुटल्याने कारने पदपथावर उभ्या असलेल्या दोघांना जोरात धडक दिली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला, तर उपचारादरम्यान दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कारच्या धडकेमुळे बंद दुकानाचे शटरही पूर्णपणे वाकले आहे. बी. के. शंकर (४५) व ओ. भूपेंद्र (५५) अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नेरूळ गावच्या प्रवेशद्वाराजवळ पदपथावर चहा पीत उभे होते. याचदरम्यान सेक्टर १६कडून वेगाने कार आली. समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारवर होणारी धडक वाचविण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचा ताबा सुटला व त्याने पदपथावरील दोघांनाही धडक दिली. हे दोघेही उडून दुकानाच्या शटरवर आदळले. कारनेही शटरला धडक दिली. अपघातामुळे प्रचंड आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी दोन्ही जखमींना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच यामधील एकाचे निधन झाले होते. दुसरी व्यक्तीही गंभीर जखमी झाली असल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याविषयी माहिती मिळताच नेरूळ पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
कारच्या धडकेने दोघांचा मृत्यू
By admin | Published: March 27, 2017 6:37 AM