नवी मुंबई : वाशीतून अपहरण झालेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून, त्याची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना व्हिसेराची प्रतीक्षा असून तो मिळण्यासाठी किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे.वाशी येथे राहणाºया शिलवंत सोनकटले (२६) या तरुणाचे अपहरण करून हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या या तरुणाच्या मोबाइलवरून त्याच्या मित्राच्या मोबाइलवर आपले अपहरण झाल्याचा मेसेज आला होता. यानंतर त्या मित्राने व शिलवंतच्या कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो झाला नाही. यामुळे त्यांनी शिलवंत याचे अपहरण झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर चार दिवसात शिलवंत याचा मृतदेह आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथील नदीमध्ये आढळून आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक पोलिसांनी पाहणी केली असता, त्याच्या शरीरावर कसलीही जखम आढळलेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच वाशी पोलिसांच्या पथकाने देखील त्याठिकाणी जावून पाहणी केली. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असा कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, शिलवंत याच्या मृत्यूचे कारण कळण्यासाठी आंध्रप्रदेश पोलिसांकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा व्हिसेरा अहवाल मिळण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळणार असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.>बेपत्ता झाल्याच्या दिवशी शिलवंत हा वाशी रेल्वेस्थानकाच्या आवारात एकटा फिरत होता. त्याठिकाणी त्याने एका एटीएम मशिनमधून पैसे काढले असल्याचे त्याचे बँक व्यवहार व्यवहार तपासताना पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यानुसार पोलिसांनी त्याठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्येही तो एकटाच दिसून आलेला आहे. मात्र यानंतर त्याने कोणाला संपर्क साधला व कुठे गेला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 2:30 AM