पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, असा आग्रह प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. यासाठी समाजमाध्यमांवर मोहीम राबविण्यासही सुरुवात केली आहे.केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव देणार असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे. या महापुरुषांची नावे अनेक प्रकल्पांना देण्यात आली आहेत. सिडकोविरोधात छेडलेला साडेबारा टक्क्यांचा लढा ‘दिबां’च्या नेतृत्वाखाली लढण्यात आला. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देऊन येथील शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांसाठी लढणाऱ्या या लढवय्या नेत्याचा यथोचित सन्मान केला जावा, अशी मागणी पुढे येत आहे.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, बॅ. ए. आर. अंतुले या नावांचीसुद्धा विमानतळाच्या नावासाठी चर्चा होत आहे; परंतु नवी मुंबई विमानतळ हे प्रामुख्याने सिडकोशी संबंधित आहे आणि ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर सिडको वसली आहे, त्यांच्या न्यायासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी येथील प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, ए. आर. अंतुले यांची नावे अन्य प्रकल्पांना द्या; परंतु नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्यावे, अशी आग्रही मागणी नवी मुंबई परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. आपली ही मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून सोशल मीडियासह विविध माध्यमातून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातूनही यासंदर्भात शासकीय पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आले आहेत.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:46 AM